अंधेरी पोटनिवडणूक : भाजपचा अजून उमेदवारच ठरला नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा अर्थ काय?
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली जाणार हे नक्की झालं आहे. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ असणार आहे. पण शिंदे आणि भाजप या दोघांपैकी नेमकं कोणाचा उमेदवार मैदानात उतरेल यावर अजून निर्णय झालेला नाही. याबाबत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी याबाबत […]
ADVERTISEMENT

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली जाणार हे नक्की झालं आहे. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ असणार आहे. पण शिंदे आणि भाजप या दोघांपैकी नेमकं कोणाचा उमेदवार मैदानात उतरेल यावर अजून निर्णय झालेला नाही. याबाबत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलताना शिवसेना की भाजप, कोण लढेल हे ठरले नाही, अशी माहिती दिली आहे. त्यामुळं पुन्हा चर्चाना उधाण आलं आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 14 ऑक्टोबर म्हणजे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. रमेश लटके यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्याकडून लढणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा न्यायालयात पोहचला आहे. यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. तर आत्तापर्यन्त भाजप या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. मागच्या निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष लढत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मुरजी पटेल भाजपचे उमेदवार असतील, असं बोललं जात होतं.
चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळं सस्पेन्स कायम?
मुरजी पटेल यांनी तशी तयारी देखील सुरु केली होती. गुरुवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं मेसेज देखील फिरवण्यात आला होता. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्या पक्षात लोकशाही आहे. कोअर कमिटी आहे. त्यांचे प्रस्ताव केंद्राच्या पार्लमेंट्री बोर्डाकडे जातात, मग निर्णय होतो. शिवसेना की भाजप, कोण लढेल हे अजून ठरले नाही, असं स्पष्ट शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने शिंदे की भाजप, कोण लढवणार निवडणूक यावर सस्पेंस कायम आहे.
दोन्हीकडे नाट्यमय घडामोडी
उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे काही तास उरले आहेत. मात्र दोन्हीकडे नाट्यमय घडामोडी सुरु आहे. सुरुवातीला ठाकरेंकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल उमेदवार असतील अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला पाठिंबा देखील उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिला. तर मुरजी पटेल यांच्या कार्यालयाचं उदघाट्न देखील मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं. पण भाजप की शिंदे या चर्चेमुळं आणि ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारल्यानं चित्र आणखी स्प्ष्ट झालेलं नाही.