मनसे आणि भाजप यांच्यातील कथित युतीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज यांनी भाजपसोबत युती केली तर त्यांचं अस्तित्व संपेल असं वक्तव्य केलं होतं. थोरातांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत, थोरातांनी आधी स्वतःची आणि पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी असा टोला लगावला आहे.
"मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे स्वतःचं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व टिकवण्यास सक्षम आहेत. त्यामुळे भाजपबरोबर त्यांनी युती केली तर त्यांचं अस्तित्व संपेल या थोरातांच्या विधानात तथ्य नाही. थोरात यांनी स्वतःचं आणि काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मनसे आणि भाजप यांच्यात युतीची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात बोलताना सांगितलं.
राजकीय-सामाजिक जीवनात कार्यरत असताना सर्वांनाच आपला पक्ष वाढवण्याची मुभा असते. तसंच समविचारी पक्षांबरोबर सुध्दा जुळवून घेता येतं. मात्र यातून कुणाचं अस्तित्व संपुष्टात येत नाही. राज ठाकरे सुध्दा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यात सक्षम आहेत, असं चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं.
उत्तरप्रदेशमधील मशिदीवरील भोंगे उतरवण्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय आणि त्याला मिळालेली राज ठाकरे यांच्या दौर्याची जोड हा केवळ योगायोग आहे. मात्र राज ठाकरे यांनी प्रार्थना स्थळावरील भोंगे उतरवण्याची घेतलेली भूमिका सामाजिक हिताची आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांनी ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय.