महाराष्ट्रातल्या राजकारणात २१ जूनला भूकंप झाला. याचं महत्त्वाचं कारण ठरलं ते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड. एकनाथ शिंदे यांनी आपणच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे घेऊन जाणार असल्याचं म्हटलं आणि थेट पक्ष नेतृत्त्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आणखी फुटू नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तर आदित्य ठाकरे, संजय राऊत हेदेखील या सगळ्याच प्रयत्नात आहेत. या बंडाचा पाचवा दिवस संपलाय. पुढचे काही दिवस हे राजकारण असंच सुरू राहणार आहे.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडत आहेत. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांची तुलना डुकरांशी आणि अफझल खान, औरंगजेब यांच्याशी केली आहे. मालाडमध्ये झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
”शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली याची शेखी मिरवणाऱ्यांना बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार नाही. मी देव मानत नाही मात्र बाळासाहेबांना मानतो. ते एक चमत्कार होते. त्यांनी महाराष्ट्र उभा केला, हिंदुत्व उभं केलं. तुम्ही त्यांचा देव आणि धर्म पळवत आहात. असं वागणारे हे अफझल खान आणि औरंगजेबच आहेत. जे अफझलखान आणि औरंगजेबाने केलं तेच तुम्ही करत आहात. ज्या भाजपने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे, त्यांच्याच मांडीला मांडीला लावून बसत आहेत. बडोद्यात झालेल्या चर्चेत शिवसेना कशी संपवायची यावर चर्चा झाल्याचं समजतं आहे. अशा लोकांच्या साथीला कसे जाता? ” असा सवाल करत संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
”काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या सुरू आहेत. चीनचं सैन्य देशात घुसलं आहे. या देशासमोर मोठे प्रश्न आहेत त्याकडे यांचं लक्ष नाही. त्यांना फक्त शिवसेना संपवायची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव संपवायचं आहे. मात्र लक्षात ठेवा हे बापजन्मात शक्य होणार नाही. जोपर्यंत शिवसैनिक आणि रणरागिणी आहेत तोपर्यंत हे शक्य नाही. असे कितीही औरंगजेब आणि अफझल खान येऊ द्या त्यांचं थडगं महाराष्ट्रात बांधलं जाईल हा महाराष्ट्राचा इतिहास आहे” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.