शिंदेंचं बंड: ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास’, शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ 30 आमदारांच्या साथीने बंडाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेच्या या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र मोठं विधान केलं आहे. ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास आहे.’ असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला सावरण्यासाठी शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी असाही विश्वास व्यक्त केला आहे की, महाराष्ट्रातील सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच चालणार. नेतृत्व बदल करण्याची काही गरज आहे असं आम्हाला वाटत नाही.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘जे काही महाराष्ट्रात झालं आहे ते तिसऱ्यांदा झालं आहे. याआधी दोनदा असा प्रकार झाला होता. मला आठवतंय की, जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन झालं होतं त्याआधी आमच्या काही आमदारांना उचलून इथं हरियाणातील काही भागात ठेवलं होतं. पण नंतर तिथून ते सुखरुपपणे निघाले. त्यानंतर आम्ही सरकार बनवलं. सरकार बनविल्यानंतर मागील अडीच वर्ष सरकार योग्य पद्धतीने चाललं आहे.’ असं शरद पवार सुरुवातीला म्हणाले.

‘काल महाराष्ट्रात निवडणूक होती. त्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना मतांचा पूर्ण कोटा मिळाला. राष्ट्रवादीचं एकही मत इकडून तिकडे गेलं नाही. त्यात कालचा जो काही प्रकार घडला त्यात आम्ही काही कोणावर नाराज नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आमच्या आघाडीचा एका उमेदवार पराभूत झाला. तिथे काही मतं फुटली. त्यामुळे संबंधित पक्षांना आपला उमेदवार जिंकवता आला नाही. याबाबत आम्ही नक्कीच चर्चा करु.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत दिली.

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात जी स्थिती आहे ते पाहता मला वाटतं की, यातून काही ना काही मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे संकेत दिले आहेत.

ADVERTISEMENT

‘शाब्बास एकनाथजी… तुझाही आनंद दिघे झाला असता’, राणेंच्या ट्विटने महाराष्ट्रात खळबळ

‘शिंदेनी मुख्यमंत्री पदाची मागणी केलीए हे मला मीडियातूनच समजतं आहे. त्यांनी तसा प्रस्ताव कोणासमोर मांडला असेल तर मला माहीत नाही. एक गोष्ट आहे की, तीन पक्षात जो समन्वय आहे यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि इतर महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी काँग्रेसकडे आहे. जे काही अंतर्गत मुद्दे आहेत त्याबाबत शिवसेनेचं नेतृत्व जे ठरवले त्यासोबत आम्ही आहोत. पण मला पूर्ण विश्वास आहे की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रातील सरकार आम्ही चालवू. यामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटत नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी आपण अद्यापही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम असल्याचं सांगितलं आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीनंतर आमची त्यांच्याशी चर्चा होईल. तो त्यांच्या पक्षाचा अतंर्गत विषय आहे. माझी कोणाशीच बातचीत झालेली नाही. शिंदे किंवा इतर आमदार कुठे थांबले आहेत हे देखील मला माहित नाही.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रच आहोत. पण नेमकी काय अडचण आहे यावर शिवसेनेची गाईडलाइन आम्हाला मिळत नाही तोवर याबाबतीत काही पावलं उचलणं योग्य ठरणार नाही. सरकार पडलं तर आम्ही विरोधतही बसू शकतो.’ अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT