"मी एवढ्यासाठी थांबलो होतो पण.." शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले गजानन किर्तीकर?

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे गजानन किर्तीकर यांनी?
Gajanan Kirtikar Left Uddhav Thackeray Shivsena Joined Eknath Shinde Group
Gajanan Kirtikar Left Uddhav Thackeray Shivsena Joined Eknath Shinde Group

ठाकरे गटाचे संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं बळ वाढल्याची चर्चा होते आहे. अशातच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कारण गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गजानन किर्तीकर शिंदे गटात आल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?

गजानन किर्तीकर आपल्यासोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर काय म्हणाले गजानन किर्तीकर?

आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा. सगळ्या खासदारांनी सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. धोरणात काहीही बदल न झाल्याने १२ खासदार बाहेर पडले. मी थांबलो होतो मला वाटलं होतं की काही बदल होतो आहे का? ते पाहावं. मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे मी अखेर साथ सोडली असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले गजानन किर्तीकर?

एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत. या आपुलकीने मी या संघटनेत प्रवेश केला असंही गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जात उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. शिंदे गटात याआधी १२ खासदार होते. ती संख्या वाढून आता १३ झाली आहे. शिंदे गटाचं बळ वाढलं आहे अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गजनन किर्तीकर यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या पत्रकात काय म्हटलं आहे?

शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे असा मजकूर या पत्रकात छापण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे - गजानन किर्तीकरांची भेट :

६ सप्टेंबरच्या मध्यरात्री खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असे सांगण्यात आले होते. मात्र या भेटीत गणपती दर्शनासह राजकीय चर्चाही झाली असल्याची माहिती समोर आली होती. याच भेटीनंतर खासदार किर्तीकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in