सोलापूर : देशविघातक कृत्य, दहशतवादी कारवायांना मदत अशा विविध आरोपांखाली केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘पीएफआय’ अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर नुकतीच बंदी घातली. याच रागातून पीएफआयच्या नावाचा उल्लेख करुन एका व्यक्तीने सोलापूर शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पत्राच्या माध्यमातून मारण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र आमदार देशमुख यांना त्यांच्या घरीच पाठविण्यात आले होते.
आमच्या संघटनेवर बंदी घातली, मात्र काही फरक पडणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे. सोबतच ‘विजयकुमार अब शुरू हो गयी असली जंग, तुम्हारा नरेंद्र मोदी व अमित शहा इन्होने जो गलत काम किया है, उसे उसका परिणाम भुगतना पडेगा’ असा मजकूर त्या पत्रात आहे. त्या पत्रात उल्लेख आहे. अयोध्या, मथुरा, काशी ही ठिकाणे आमचे ‘सुसाईड बॉम्बर’ एका दिवसात उडवतील, अशीही त्यात धमकी देण्यात आली आहे.
याशिवाय पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा ऐकेरी उल्लेख करण्यात आला आहे. आमदार देशमुख यांना ४ ऑक्टोबर रोजी घरी हे धमकीचे पत्र मिळाले. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची तातडीने भेट घेतली.
दरम्यान, पत्राचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त डॉ. माने यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखा आणि ‘एटीसी’ने तपास सुरु केला असून गुन्हे शाखेने पत्रातील नमुद पत्त्यावर आणि परिसरात जावून त्या व्यक्तीचा शोध घेतला. पण, त्या नावाचा कोणीही व्यक्ती त्याठिकाणी नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे कोणी केवळ खोडसाळपणा केला की दुसऱ्याच्या नावाने कोणी पत्र लिहून ते खरंच संघटनेशी संबंधित कोणी पाठविले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
आसिफ शेखला मंगळवारपर्यंत कोठडी
‘पीएफआय’शी संबंधित आसिफ अस्लम शेख याला काही दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, विजापूर नाका पोलिसांनी पुन्हा बाजू मांडत त्याची कोठडी ११ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. त्याचा मोबाइल व त्याच्याकडे मिळालेल्या ‘सीडी’चा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.