पंकजा मुंडे वाऱ्यावर अन्…; फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊतांनी ठेवलं बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना भाजपने डावलल्याचं म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला असून, देवेंद्र फडणवीसांनी नुपूर शर्मा यांना दिलेल्या पाठिंब्यावरून टीका केली आहे.

संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, नुपूर शर्मा विधान आणि पंकजा मुंडे आदी विषयांवर भाष्य केलं आहे.

संजय राऊतांनी काय म्हटलंय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही,” असं राऊत म्हणाले.

“काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते. पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नूपुर शर्मांना फडणवीस फोन करून ‘‘बेटी, चिंता मत करो!’’ असा धीर देतात तेव्हा आश्चर्य वाटते. ज्या नूपुर शर्मांच्या वक्तव्यामुळे देश दहशतवादी हल्ल्याच्या स्फोटकांवर उभा आहे, त्यांना एक नेता कसे काय पाठबळ देऊ शकतो? पंकजा मुंडे वाऱ्यावर आहेत व देशात अराजक माजवू पाहणाऱ्या नूपुर शर्मासारख्यांना भाजपचा राजाश्रय आहे.”

ADVERTISEMENT

“राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण भाजपचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही? हा माझा प्रश्न आहे,” असा सवाल राऊतांनी भाजपला केला आहे.

“सर्वच गोष्टींचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण. विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी हातातून दूर केली तर भाजपकडे काय उरते? त्यांचीही मूठ रिकामीच आहे! देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, पण या व्यापारी साठमारीत महाराष्ट्राला काय मिळाले?”

ADVERTISEMENT

“लाखो कोटी रुपयांचा काळा पैसा आजही आपल्या राजकीय व्यवस्थेत खेळतो आहे. हा काळा पैसा ज्या मक्तेदार भांडवलशाहीतून निर्माण झाला ती मक्तेदारी मोडून काळा पैसा संपविण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेवर आले, पण काळा पैसा आहे तसाच आहे. किंबहुना, काळा पैसा हेच भाजपचे बलस्थान बनले आहे. भाजपचे राज्य जेथे नाही तेथे ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ म्हणून बोटे दाखवली जातात, पण प्रत्येक निवडणुकीत जे कोट्यवधी रुपये हे लोक उधळत आहेत तो पैसा कोठून आला? जिथून आला तिथे ते प्रहार कसा करतील?,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मतभेद हा लोकशाहीचा मूलाधारच आहे. सर्वांनी एकसारखीच मते बाळगावीत, अशी अपेक्षा असेल तर लोकशाहीचे नाव कशासाठी घ्यायचे? ज्यांचे मतभेद असतील त्यांच्याविषयी योग्य तो आदर फक्त लोकशाहीतच राखला जातो.”

“आपल्या देशातील ज्या ज्या थोर पुरुषांनी देशासाठी त्याग केला, कष्ट सोसले, उभी हयात व्रतस्थपणे लोकांच्या सेवेत वेचली त्यांच्याविषयी केवळ मतभेद आहेत म्हणून वाटेल ती विधाने करणे अथवा त्यांचा अवमान करणे हे लोकशाहीचे नाही, तर फॅसिस्ट मनोवृत्तीचेच लक्षण आहे. भ्रष्ट मार्गाने कोट्यवधी रुपयांच्या इस्टेटी जमा करणारेच नैतिकता व भ्रष्टाचारावर धडे देतात, हे उचित नाही. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले. विधान परिषद निवडणुकीत ते मुखवटे साफ फाटतील!,” असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT