ओमराजे निंबाळकरांनी औकात काढली; राणा जगजितसिंह पाटलांनी लायकी सांगत दिलं प्रत्युत्तर

"तु तुझ्या औकातीत रहा" म्हणतं ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटलांना भिडले
Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkar
Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkarMumbai Tak

उस्मानाबाद (गणेश जाधव) : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर संस्कार नाहीत. त्यामुळे ते तसे बोलले. पण त्यांच्यावर बोलण्यात मी वेळ घालवतं नाही. ओमराजे निंबाळकर यांची लायकी नाही. असे लोकप्रतिनिधी असणं जिल्ह्याचं मोठं दुर्दैव आहे. त्यांचा इतिहास सर्वांना माहित आहे, असं म्हणतं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रत्युत्तर दिलं. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर बोलत होते.

उस्मानाबादमधील निंबाळकर-पाटील घराण्यातील जुना वाद आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा उफाळून आला. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातच एकमेकांना भिडले. दोघांमध्येही टोकाचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. याच वादानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

आमदार राणा जगजितसिंह पाटील काय म्हणाले?

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर संस्कार नाहीत. त्यामुळे ते तसे बोलले. पण त्यांच्यावर बोलण्यात मी वेळ घालवतं नाही. ओमराजे निंबाळकरांची लायकी नाही. असे लोकप्रतिनिधी असणं जिल्ह्याचं मोठं दुर्दैव आहे. त्यांचा इतिहास सर्वांना माहित आहे. ठाकरे सरकार असताना पीक विमा देता आला नाही, त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले, मला या लोकांविषयी बोलायला आवडत नाही. मी माझ्या संस्काराप्रमाणे शब्द गिळत असतो. या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही. ते काय आहेत हे सर्व जनतेला माहित आहे. नुसता कांगावा करणं, ओरडा-ओरडं करणं, अपशब्द वापरणं यामुळे काही होतं नसतं. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं?

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसानीपोटी मिळणाऱ्या भरपाईची आढावा बैठक शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरु असतानाच तिथं ओमराजे निंबाळकर यांची एन्ट्री झाली. राणा जगजितसिंह पाटील आधीपासून उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींना बोलवण्याच्या कारणावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोर शाब्दिक चकमक झाली.

सदरील बैठकीस लोकप्रतिनिधींना का बोलवण्यात आले नाही असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी सचिन ओमबासे यांना केला. तेव्हा राणाजगजितसिंह पाटील ओमराजे यांना उद्देशून "बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे" असं म्हणाले. यावरुनच ओमराजे यांचा संताप अनावर झाला. "तु नीट बोल, बाळ म्हणू नकोस, तुझ्या औकातीत राहा, तु नीट बोलं", असं सुनावायला सुरुवात केली.

यावर राणा जगजितसिंह पाटील यांनी "बाळचं आहेस तु" असा टोमणा मारला. तर ओमराजे म्हणाले, तुमचे संस्कार, तुमची औकात सगळं माहित आहे. तुला बोललेलो नाही, मला बोलायचं कारण नाही, अशा एकेरी भाषेत राणा जगजितसिंह पाटील यांना सुनावलं. यावेळी जिल्हाधिकारी यांनीही दोन्ही लोकप्रतिनिधींना शांत करण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in