“युद्धाला तोंड फुटेल”, संजय राऊतांचा अमित शाह-नरेंद्र मोदींवर हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena Crisis, Sanjay Raut : शिवसेना एकनाथ शिदेंच्या ताब्यात गेली. त्यामुळे ठाकरे विरुद्ध संघर्ष पेटला आहे. अमित शाह यांनीही पुण्यात मोठं विधान केलं होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून थेट मोदी-शाह-फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. “अमित शहा व फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले”, असं मोठं विधान राऊतांनी केलं.

संजय राऊतांनी रोखठोमध्ये म्हटलं आहे की, “ठाकऱ्यांची शिवसेना एका झटक्यात शिंद्यांची झाली. निवडणूक आयोगाने फक्त 40 आमदारांची ‘मते’ मोजून शिवसेना आणि धनुष्यबाणाचा सौदा केला. इतिहासात असे कधीच घडले नव्हते. लोकशाहीचा खून झाला असे नेहमीच म्हटले जाते, पण खून कसा करतात ते शिवसेनेच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने दाखवून दिले. पुढे काय होणार?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.

“निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने ठाकऱ्यांची ऐतिहासिक शिवसेना शिंद्यांची झाली. त्या शिवसेनेचा पसारा आणि ओझे डोक्यावर घेऊन श्रीमान शिंदे किती तग धरणार? शिवसेना म्हणजे ‘ठाकरे’ हे समीकरण गेल्या पन्नास वर्षांपासून आहे. ते जगाला समजले, पण फक्त निवडणूक आयोगाला समजले नाही”, असं म्हणत राऊतांनी आयोगावर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील

म्हैस आणि हत्तीचं उदाहरण… न्यायव्यवस्थेवर राऊतांचं लक्ष्य

सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा वाद सुरू आहे. याबद्दल राऊतांनी म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दाद मागण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. खरी शिवसेना आमचीच हे सर्वोच्च न्यायालयात ‘ठाकरे’ यांना सिद्ध करावे लागते हे महाराष्ट्राचे व न्याय व्यवस्थेचे दुर्दैव! आता न्यायालयात काय होणार? एक गोष्ट या निमित्ताने आठवते,

ADVERTISEMENT

एक म्हैस जंगलात पळताना पाहून हत्तीने विचारले, ‘‘काय गं, काय झाले इतके घाबरेघुबरे होऊन पळायला?’’

ADVERTISEMENT

म्हैस : अरे बाबा, ते लोक गायींना अटक करून नेत आहेत.

हत्ती : पण तू कोठे गाय आहेस?

म्हैस : ते मला माहीत आहे, पण मी गाय नाही हे भारतीय न्यायालयात सिद्ध करण्यासाठी मला 25 वर्षे लागतील.

हे ऐकताच तो हत्तीही घाबरून पळू लागला.

सध्या न्याय व्यवस्थेसह देशातील सर्वच शासकीय यंत्रणांची हीच स्थिती आहे. सत्य व त्याबाबतचे पुरावे यांना काहीच किंमत राहिलेली नाही. सत्य हा बचाव आणि पुरावा होऊ शकत नाही”, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Thackeray यांच्या बहुमताची सरन्यायाधीशांनी स्वत: केली आकडेमोड, कोर्टात काय लागणार निकाल?

संजय राऊतांचे निवडणूक आयोगाला सवाल

“लोकशाहीचा खून झाला. सत्य मारले गेले, असे दाखले विरोधक नेहमीच देत असतात. पण हा लोकशाहीचा खून कसा होतो त्याचे प्रात्यक्षिक देशाच्या निवडणूक आयोगाने दाखवून दिले. शिवसेनेत फूट पडली व शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार पक्ष सोडून गेले. ही विधिमंडळ पक्षातील फूट फार तर होऊ शकते. आमदार व खासदारांनी पक्ष सोडल्याने पक्ष त्यांच्या मालकीचा होत नाही. पण आपल्या विद्वान निवडणूक आयोगाने फुटलेल्या आमदार-खासदारांची मते मोजून निर्णय दिला. मग महाराष्ट्रातील शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, इतर लोकप्रतिनिधी यांना मिळालेली मते का मोजली नाहीत?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.

“शिवसेनेनेच या फुटिरांना उमेदवारी दिली व निवडून आणले हे आयोगाच्या लक्षात आले नाही. कारण त्यांना सत्य झाकूनच निर्णय द्यायचा होता व दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचे तसे आदेश होते. शिवसेनेने विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले. जे जिंकले त्यातील काहीजण फुटले. त्यांची मते निर्णायक कशी ठरू शकतात? जे पराभूत झाले त्या शिवसेना उमेदवारांनाही लाखो मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने आपला स्वतंत्र बाणा राखला नाही व आपलेच पूर्वसुरी शेषन यांचा आदर्श ठेवला नाही. शिवसेना विकण्याचा व विकत घेण्याचा निर्णय दिल्लीने आधीच घेतला. त्या सौद्यात आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. इतके होऊनही शिंदे यांच्या सेनेस कोणी शिवसेना मानायला तयार नाही”, अशी टीका राऊतांनी केलीये.

Rahul Narwekar: ठाकरे गटाचं काय होणार? विधानसभा अध्यक्षांनी सांगितला कायदा

अमित शाह, नरेंद्र मोदींवर टीका

“गृहमंत्री अमित शहा व त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांच्या सुडाच्या व बदल्याच्या राजकारणातून शिवसेनेवर इतिहासातील भयंकर हल्ला झाला. अमित शहा यांच्या अहंकारातून हे सर्व घडले. 2019 साली भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. त्यातूनच महाराष्ट्रात नवे महाभारत घडले”, असं म्हणत राऊतांनी मोदी शाहांवर निशाणा साधला.

“भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. तरीही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेली हा जनादेशाचा अपमान असल्याचे शहांपासून फडणवीसांपर्यंत सगळेच बोलतात. पण 2014 साली भाजपने शिवसेनेस दगा दिला. दोघांनी एकमेकांविरुद्ध स्वतंत्र निवडणुका लढवल्या व तरीही सत्तेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले. हा तरी जनादेश कोठे होता? कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर निवडणुकीनंतर भाजपने सत्ता स्थापन केली. हासुद्धा जनादेश नव्हताच. त्यामुळे जनादेशाचा अपमान केला म्हणून शिवसेना फोडली व सत्ता बनवली ही पोपटपंची बरी नाही”, अशी टीका राऊतांनी केली आहे.

“शिवसेना एका द्वेषातून व सूडभावनेतून फोडण्यात आली. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर सूडाची तलवार चालवण्यासाठी दिल्लीने पुन्हा एकदा मराठी माणसाचाच वापर केला. शिंदे व त्यांच्या लोकांनी केलेल्या बेइमानीची नोंद इतिहासात काळ्याकुट्ट शाईने केली जाईल. जे गेल्या 50-55 वर्षांत काँग्रेसला जमले नाही, गुंड टोळ्यांना, पाकिस्तानला जमले नाही ते शिंदे यांच्यासारख्यांना हाताशी धरून मोदी-शहांनी केले”, असं राऊत म्हणाले.

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील 12 मुद्दे ठरवणार ठाकरेंचं भवितव्य!

“शिंदे यांच्याबरोबर 10 च्या वर आमदार नव्हते. अमित शहा व फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले. ‘तुम्ही सुरतला पोहोचा. निवडणूक आयोग व पुढचे सर्व निकाल शिंदे यांच्याच बाजूने लावले जातील. चिन्ह व शिवसेना शिंद्यांनाच मिळेल,’ असे उरलेल्या आमदारांना सांगितले गेले व त्याबाबतचे सूतोवाच फडणवीसांपासून शिंदे गटाच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांत जाहीरपणे केले. कालच्या निकालाने ते सत्य ठरले. उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना राहणार नाही. सर्व काही शिंद्यांनाच देऊ, असे आमदार-खासदारांना ठामपणे सांगितले गेले आणि नंतर तसेच घडले”, आरोप राऊतांनी फडणवीस आणि अमित शाहांवर केला आहे.

रावणाचेही राज्य गेले, राऊतांचा अमित शाहांना इशारा

“शिवसेना फोडून व धनुष्यबाण चिन्ह फुटीर गटास देऊन आपण भलताच मोठा भीमपराक्रम गाजवला अशा थाटात अमित शहा कोल्हापुरात आले व त्यांनी जोरदार भाषण केले. सत्ता अमर नाही व लोकशाही मारणाऱ्यांचा अंत जगभरात झाला हे ते विसरले. रावणाचेही राज्य गेले व दिल्लीतील मोगलांचेही राज्य संपले. लोक खवळून उठले तेव्हा ब्रिटिशांनाही हिंदुस्थान सोडावा लागला”, असा इशारा राऊतांनी दिला.

“मोगलांचे वंशज आज कधी काळी त्यांचीच मालकी असलेल्या लाल किल्ला परिसरात जगण्यासाठी झुंजत आहेत. हिंदुस्थान लुटण्यासाठीच इंग्रज आले होते. लॉर्ड हेस्टिंग्जने आग्र्याच्या प्रासादातील मोगल बादशहाचे स्नानगृह फोडले व तेथील संगमरवरी लाद्या व नक्षीकाम काढून इंग्लंडच्या चौथ्या जॉर्जला ते नजर केले. उरलेल्या सर्व मालाचा लॉर्ड विल्यम बेंटिंकने लिलाव केला. आजच्या दिल्लीवाल्यांना मुंबईसह महाराष्ट्र अशाच पद्धतीने लुटायचा आहे व त्यासाठी त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रातून उखडण्याचे कारस्थान रचले.”

बाळाजी पंत नातू… राऊत काय म्हणाले?

“पुण्याच्या शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकविण्याचे काम आपल्यातीलच एका स्वकीयाने केले, त्याचे नाव बाळाजी पंत नातू. त्याच बाळाजी पंतांच्या विचारांचे वारसदार दिल्लीने महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवले. शिवसेनेचा महाराष्ट्रावरील भगवा त्यांना कायमचा उतरवायचा आहे. बेइमानांच्या हातात कारस्थानी पद्धतीने शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन पहिले पाऊल टाकले आहे. मराठी माणूस मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वाभिमान, अस्मितेच्या युद्धाला तोंड फुटेल! तोपर्यंत जागते रहो”, असा इशारा राऊतांनी दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT