राज्यसभा निवडणूक: संजय राऊतांनी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!
shiv sena leader sanjay raut gives advice to congress over rajya sabha elections candidate

राज्यसभा निवडणूक: संजय राऊतांनी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांवरुन थेट काँग्रेसला सल्ला दिला आहे.

पुणे: महाविकास आघाडी घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट काँग्रेसलाच सल्ला दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तोलामोलाची माणसं आहेत असं असताना काँग्रेस महाराष्ट्रातून राज्यसभेवर बाहेरची माणसं का पाठवत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'खरं तर राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तरीही देशातलं राजकारण पाहता काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं.'

'गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष राज्यसभेवर बाहेरची माणसं पाठवतो आहे. नक्कीच त्याचा परिणाम राज्यातील काँग्रेस पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रात काय तोलामोलाची माणसं काय कमी नाहीत काँग्रेस पक्षात.' असा एक सल्लाच संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

'काँग्रेसने सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज'

'उत्तम माणसं, उत्तम कार्यकर्ते आहेत. आता मी फार बोलणं बरं नाही. पण छत्तीसगड, राज्यस्थान ही दोन राज्य काँग्रेसकडे आहेत. तिथेही सर्व उमेदवार बाहेरचेच आहेत. त्याचा एक परिणाम नक्कीच स्थानिक कार्यकर्त्यांवर होतो. हे फक्त काँग्रेसच्याच संदर्भात नाही तर इतर राजकीय पक्षात सुद्धा असे निर्णय घेतले जातात तेव्हा स्थानिक लोकं दुखावले जातात. विशेषत: काँग्रेस पक्षाला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची सर्वात जास्त गरज आहे.' असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

'या देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं'

'आम्हाला काँग्रेसची गरज आहे. किंबहुना या देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं असं सांगणारे आम्ही आहोत. काँग्रेसशिवाय या देशात प्रमुख विरोधी पक्ष हा पुढे जाऊ शकणार नाही. काँग्रेसने आपली प्रकृती सुधारावी हे सांगणारे आम्ही आहोत.' असा चिमटाही संजय राऊतांनी यावेळी काँग्रेसला काढला.

'भाजपचे घोडे किती उधळू द्या.. जिंकणार शिवसेनाच'

'त्यांचे घोडे किती उधळू द्या.. जिंकणार आम्हीच.. शिवसेनेचा सहावा उमेदवार संजय पवार हा राज्यसभेत जाईल. आमच्या विजयासाठी जी मतं आवश्यक आहेत त्याची व्यवस्था झालेली आहे. कोणत्याही घोडेबाजाराशिवाय ही व्यवस्था झालेली आहे.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

shiv sena leader sanjay raut gives advice to congress over rajya sabha elections candidate
'राज्यसभा निवडणुकीत मोठ्या पक्षाचा उमेदवार पडू शकतो', चंद्रकांत पाटलांचा राऊतांकडे रोख?

'राजेंना समर्थक नसतात, राजाला फक्त प्रजा असते'

'राजेंना समर्थक नसतात. राजाला फक्त प्रजा असते. मी पहिल्यांदाच ऐकतोय की, राजाला समर्थक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थक नव्हते. सगळे मावळे, संपूर्ण राज्य त्यांचं होतं. ते एका जातीचे, पंथाचे किंवा धर्माचे राजे नव्हते. पंतप्रधानाला समर्थक नसतात. देश त्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांना समर्थक नसतात. राज्य त्यांचं असतं. तसंच राजांचं असतं.' असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या मुद्द्यावर फारस भाष्य करणं टाळलं.

'संभाजीराजे आणि माझं बोलणं सुरु आहे. ते आमचे सर्वांचे मित्र आहेत. राजकारणात असे चढ-उतार असतात. आपण राजकारणामध्ये आहात मग हे धक्के पचवले पाहिजेत. ज्यांना हे पचविण्याची ताकद आहे त्यांनी राजकारणात यावं.' असा सल्लाही संजय राऊत यांनी संभाजीराजेंना दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in