Shiv Sena: शरद पवारांसाठी शिवसेना पुढे सरसावली, भाजपवर तुफान बरसली!

Saamana Editorial: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असून ते हिंदू विरोधी आहेत अशी टीका भाजपकडून केली जात असताना आता त्याला शिवसेनेने सामनातून प्रत्युत्तर दिलं आहे.
Shiv Sena: शरद पवारांसाठी शिवसेना पुढे सरसावली, भाजपवर तुफान बरसली!
shiv sena moves forward to defend sharad pawar strong criticism on bjp from saamana editorial(फाइल फोटो)

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात एका कवितेचं वाचन केलं. याच कवितेवरुन शरद पवारांना भाजपकडून टार्गेट केलं जात आहे. पवार हे हिंदूविरोधी असल्याची टीकाही यावेळी केली जात आहे. या टीकेचा वाढता जोर पाहून पवारांच्या बचावासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. यावेळी शिवसेना फक्त पुढे सरसावलेलीच नाही तर भाजपवर तुफान बरसली देखील आहे.

भाजपकडून शरद पवारांवर जी टीका सध्या सुरु आहे त्याला शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून प्रत्युत्तर दिलं आहे. 'भाजपला देशात वेगळ्या पद्धतीची तालिबानी व्यवस्था निर्माण करायची आहे. सामान्य माणसाला धर्माच्या उलटसुलट विचारांत अडकवायचे व पोटातली भूक विसरायला लावायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत.' अशी थेट टीका सामनातून करण्यात आली आहे.

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

 • ईश्वराला बाप नसतो, असे नेहमीच सांगितले जाते. मुळात या सर्व कल्पनांची निर्मिती केली आहे ती माणसाने. आपल्या कल्पनाशक्तीनुसार माणसाने देवांना रूप दिले, त्यानुसार मूर्ती घडविल्या. मात्र ज्यांनी त्या घडविल्या त्यांनाच नंतर देवाचे दर्शन घेण्यास बंदी घातली.

 • ‘पाथरवट’ या कवितेत जवाहर राठोड यांनी हीच वेदना व्यक्त केली आहे. ‘आम्ही देवांना रुपडं दिलं आहे, तेव्हा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच देवाचे पिता?’ असा प्रश्न कवीने केला आहे. त्यामागील भावना समजून न घेता ‘देवाचे बाप कोण?’ अशी आदळआपट सुरू आहे आणि साताऱयातील एका कार्यक्रमात ती कविता वाचून दाखविणाऱया शरद पवारांवर टीका केली जात आहे.

 • ही कविता म्हणजे कष्टकऱयांची व्यथा आहे. देशातील मजूर, शोषित, दीनदुबळ्यांच्या व्यथांचा आक्रोश आहे. भाजपच्या हिंदुत्वात या पीडितांना स्थान नाही काय?

 • मला शेंडी-जानव्याचे, फक्त घंटा बडवणाऱयाचे हिंदुत्व नको असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत. त्यांचे हिंदुत्व विज्ञानवादी व पुरोगामी होते, पण आज राज्यात हिंदुत्वाचे जे ठेकेदार निर्माण झाले आहेत त्यांचे हिंदुत्व लोकांत दंगली आणि मनभेद करणारे आहे.

 • छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माने हिंदूच होते. संत गाडगे महाराज हेसुद्धा जन्माने आणि कर्माने हिंदू होते, पण त्यांनी हिंदू धर्मातील रूढी, परंपरांवर टीका केली म्हणून ते हिंदू धर्माचे दुश्मन असे म्हणता येणार नाही.

 • भारतीय जनता पक्षाच्या व त्यांच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. श्री. शरद पवार यांनी साताऱयात एक भाषण केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या ‘सोशल मीडिया’वाल्यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. पवारांनी म्हणे हिंदू देवदेवतांचे बाप काढले. पवार नास्तिक आहेत व हिंदुद्वेष्टे आहेत. पवारांनी जवाहर राठोड या कवीची एक कविता काय वाचून दाखवली आणि भाजपच्या लोकांच्या अंगावर जणू विंचवांची पिलावळच पडली.

 • पवारांनी भाषणात सांगितले, शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना उपेक्षित समाजातील मुले उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड या दिवंगत कवीचे स्मरण त्यांनी केले व त्याची ‘पाथरवट’ कविता वाचून दाखवली. ‘पाथरवट’ कवितेत कवी म्हणतो, ‘‘आम्ही पाथरवट निर्माण करतोय चक्कीचे पाट, ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला, आम्ही मात्र अन्नाच्या कण्यासाठी रोज नुसती घरघर करतोय, दुसरं काय तर आमचं दुर्दैव, आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसलो जातोय.

 • तुमच्या ब्रह्मा, विष्णू, महेशाला, लक्ष्मी अन् सरस्वतीला आम्हीच रुपडं दिलंय, आता तुम्ही खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता?’’ त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असे जवाहर राठोडने लिहून ठेवलं, असे पवारांनी सांगितले.

 • जवाहरची कविता विद्रोही आहे, समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणारी आहे. नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, राजा ढाले यांनी जी वाट कवितेत निर्माण केली त्याच वाटेने जाणारी ही जवाहरची ‘पाथरवट’ आहे. त्यातली एक बंडखोर कविता पवारांनी वाचून दाखवली. पवारांसारखे राजकारणी आजही वाचतात. भाजपवाल्यांना वाचनाचे वावडे आहे. ते वाचत नाहीत म्हणून वाचले नाहीत. त्यांच्या सांस्कृतिक गटांगळ्या सुरू आहेत.

shiv sena moves forward to defend sharad pawar strong criticism on bjp from saamana editorial
नास्तिक म्हणजे काय रे भाऊ?, शरद पवार, भगतसिंग यांच्यात काय आहे साम्य?
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा लढा काय होता? साने गुरुजीही काळाराम मंदिराच्या लढय़ात होते. संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचा झाडू महाराष्ट्रात फिरवला. गाडगेबाबांची कीर्तने ज्यांनी ऐकली त्यांना जवाहर राठोडचे दुःख कळेल. त्यांच्या कीर्तनात कर्मकांड नव्हते, पोथी नव्हती, पुराणे नव्हती, देवांची वर्णने नव्हती, मूर्तिपूजा तर नव्हतीच नव्हती.

 • याच हिंदुत्वाचा पुरस्कार आजचे भाजपवाले करू पाहत आहेत व त्यांना देशात वेगळ्या पद्धतीची तालिबानी व्यवस्था निर्माण करायची आहे. सामान्य माणसाला धर्माच्या उलटसुलट विचारांत अडकवायचे व पोटातली भूक विसरायला लावायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत.

 • देशाची मनःशांती बिघडविणारे धर्मांध राजकारण हे लोक करू पाहत आहेत. लेखक-कवींनी काय लिहायचे व कोणी काय वाचायचे यावर राजकीय सेन्सॉरशिप घातली जात असेल तर ‘पाथरवट’चा विद्रोह तीव्र करावा लागेल. देशाला एक हजार वर्षें मागे नेण्याचे धार्मिक प्रयोग म्हणजे हिंदुत्व असे ज्यांना वाटते त्यांच्या हाती 130 कोटींच्या देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही.

Related Stories

No stories found.