Shivsena: "प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार महाराष्ट्रात अवतरलं आहे"

सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारवर ताशेरे
Shivsena Criticized Shinde Fadnavis Government in Saamana Editorial
Shivsena Criticized Shinde Fadnavis Government in Saamana Editorial

२६ आणि २७ जुलै या दोन दिवशी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत पार पडली. या मुलाखतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता मी फिक्स मॅच पाहात नाही. मी लाइव्ह मॅच पाहतो. प्रतिक्रिया द्यायचीच असेल तर पाहू असं म्हणत या मुलाखतीवर दोन ओळीतच प्रतिक्रिया दिली. मात्र आता सामनातून देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. तसंच आत्ता निर्माण झालेलं सरकार हे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे अशीही टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळानंतर एक मुलाखत काय दिली राज्याला जणून भूकंपाचे हादरे बसले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया येणं सुरू झालं आहे. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत या मुलाखतीची चर्चा होते आहे. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमुठ आवळून बसले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे या नावाचं महत्त्व अधोरेखित करणारं हे दृश्य आहे. घरातल्याच लोकांनी दगाबाजी केली याबद्दल उद्धव ठाकरेंनी मन मोकळे केले. रूग्णालयात अतिदक्षता विभागात उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना बाहेर सरकार उलथवून टाकण्याचे अघोरी प्रकार कसे सुरू होते त्यावर उद्धव ठाकरे बोलले.

उद्धव ठाकरे बोलले हेच फडणवीसांच्या संतापाचं कारण

उद्धव ठाकरे यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न कसे सुरू होते ते सांगितलं हेच देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचं कारण आहे. ठाकरे-राऊत मॅच फिक्स होती, तर मग उद्धव ठाकरे रूग्णालयात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या त्या फिक्सिंगला कोणतं नाव द्यायचं? हे सर्व पाहिलं की वाटतं महाराष्ट्रात प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार अवतरलं आहे. महाराष्ट्राची अवस्था हे भकास करणार आहेत. महाराष्ट्राला महापूर-प्रलयाने वेढलं आहे. पाणी आता उतरलं असलं तरीही घरंदारं, पिकं नष्ट झाली आहेत. मात्र लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारचं अस्तित्वच नाही.

मंत्रिमडळाचा विस्तार महिना उलटूनही झालेला नाही हा चिंतेचा विषय आहे. फिक्सिंग करून सरकार जन्माला घातलं खरं पण ते रडत नाही की हात-पाय हलवत नाही. सरकारचा जन्मच अनैसर्गिक स्थितीत झाला आहे त्यामुळे दुसरे काय होणार?

डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे एक शहाणे गृहस्थ आहेत. आयपीएलच्या सामन्याचं पद गुजरात संघाकडे गेलं तेव्हा त्यांनी हा घोटाळा असल्याचा दावा केला. गुजरात संघ जिंकणं म्हणजे पद्धतशीरपणे मॅच फिक्सिंग आहे असं त्यांनी म्हटलं. अगदी अशाच पद्धतीने महाराष्ट्रात फिक्सिंग करून शिंदे फडणवीस सरकार आले आहे असाही आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in