राणा पाटलांच्या शेजारी का बसले? ट्रोलिंग झाल्यावर ओमराजे रोखठोक

मुंबई तक

राजकीय प्रतिस्पर्धी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत केलेला एकाच गाडीतील प्रवास, महायुतीतील संबंध, विकासनिधी, २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न, सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या टीकेसह विविध मुद्द्यांवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

Omraje Nimbalkar EXCLUSIVE
Omraje Nimbalkar EXCLUSIVE
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राणा पाटलांच्या शेजारी का बसले?

point

ट्रोलिंग झाल्यावर ओमराजे रोखठोक

Omraje Nimbalkar EXCLUSIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील भीषण परिस्थितीवर भाष्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा साठा केवळ 8 टक्के उरला असून बाष्पीभवन पाहता हा साठा 5 टक्क्यांवर आला आहे. शेतकऱ्यांनी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च करून पेरलेले सोयाबीन पूर्णपणे वाया गेले असून, त्यांच्या हाती एक पैसाही पडण्याची शक्यता नाही. संपूर्ण प्रपंच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांपुढे मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी मिळावे

मदतीच्या निकषांबाबत बोलताना निंबाळकर यांनी पीक विम्याच्या अटींमध्ये बदल करण्याची मागणी केली. सॅटेलाईट इमेजिंगद्वारे पिके हिरवी दिसत असली तरी प्रत्यक्षात त्याला शेंगा लागलेल्या नाहीत, त्यामुळे केवळ महसूल विभागाच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई देण्यात यावी, असे त्यांनी सुचवले. यासोबतच, मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी 2029 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत धाराशिवला मिळावे, जेणेकरून इथला शेतकरी कायमस्वरूपी या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच पुढील आठ महिन्यांसाठी चारा आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

हे ही वाचा : मोठी बातमी : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 'या' सवलती

मेटल डिटेक्टरच्या तपासणीवरुन नाराजी

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात मलकापूर येथे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवून मेटल डिटेक्टरने तपासणी केल्याच्या प्रकारावर निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना स्वतः शेतकऱ्यांशी थेट संवाद साधायचा होता, तरीही पोलिसांनी असा प्रकार का केला, हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, दौऱ्यातील एका व्हायरल व्हिडिओवरून अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा दानवे यांनी एक दिवस आपल्यासोबत राहून लोकांची कामे कशी केली जातात हे पाहावे, असा टोला त्यांनी लगावला. आपण सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असतो, त्यामुळे अशा कुरघड्यांकडे लक्ष देण्यापेक्षा जनहिताला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : सतेज पाटील एकटे पडले का? गोकुळ निवडणूक का गाजतेय?

राणा पाटील यांच्यासोबतच्या प्रवासाबद्दल काय म्हणाले?

राजकीय आणि कौटुंबिक वैमनस्य असलेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावर निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले. राज्याच्या प्रमुखांना दुष्काळाची वस्तुस्थिती सांगणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याने आपण काही वेळासाठी मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत राणा पाटील आणि त्यांच्या प्रवृत्तीला आपला कायमस्वरूपी विरोध राहील, यात कोणतीही तडजोड शक्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, पाटील यांच्याकडून काळ्या पैशाचा वापर करून सोशल मीडियावर फेक अकाऊंट्सद्वारे बदनामीकारक ट्रोलिंग करण्यासाठी 'वॉर रूम' चालवली जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.