एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये डंका! दौऱ्याचा अर्थ काय? पडद्यामागची स्टोरी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी लंडनमध्ये पोहोचले आहेत. तेथील हिथ्रो विमानतळावर त्यांचे अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. लंडन येथील मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात संपूर्ण विमानतळ परिसर दणाणून सोडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये डंका!
दौऱ्याचा अर्थ काय?
पडद्यामागची स्टोरी
Eknath Shinde London Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सध्याचा दोन दिवसीय लंडन दौरा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान आयोजित या विशेष दौऱ्यात ब्रिटिश संसदेच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये युके एशियन बिझनेस कौन्सिलतर्फे त्यांना 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' प्रदान करण्यात आले असून, 'हाऊस ऑफ कॉमन्स'मधील इंटरनॅशनल कॉन्क्लेवमध्ये 'स्टेट्समनशिप अवॉर्ड'नेही सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय 94 वर्षांची परंपरा असलेल्या लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' हा मानाचा पुरस्कारही त्यांना दिला जात आहे. 'माझी लाडकी बहीण', 'शासन आपल्या दारी' आणि 'युवा कार्य प्रशिक्षण' या लोककल्याणकारी योजनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले हे ब्रँडिंग शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील बळकट स्थान
या दौऱ्याचे राजकीय वेध घेता शिंदे यांनी आपली पारंपरिक 'मास लीडर' आणि 'ठाण्याचे भाई' ही प्रतिमा मागे टाकत स्वतःला एक सक्षम आणि दूरदृष्टी असलेला प्रशासक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीस 'देवाभाऊ' अभियानाद्वारे आपली लोकाभिमुख प्रतिमा निर्माण करत असताना, शिंदे यांनी थेट लंडनच्या संसदेतून जागतिक मान्यता मिळवत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील आपले स्थान अधिक बळकट करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील लोकप्रिय योजनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन त्यांनी प्रशासकीय कौशल्याचे अप्रत्यक्ष आव्हानच राजकीय विरोधक आणि मित्रांसमोर उभे केले आहे.
हे ही वाचा : 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' विद्यानंद बापटांची चावडीवर चौफेर फटकेबाजी
बहुजन मतदारांशी नातं
पुरस्कार सोहळ्यांसोबतच शिंदे यांनी या दौऱ्यात लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासाला भेट देऊन आदरांजली वाहण्याचे नियोजन केले आहे. या कृतीतून महाराष्ट्रातील दलित आणि बहुजन मतदारांशी थेट नातं जोडण्याचा स्पष्ट राजकीय प्रयत्न दिसतो. त्याचप्रमाणे, लंडनस्थित उच्चशिक्षित मराठी लोकांशी साधलेला संवाद हा शहरी, मध्यमवर्गीय आणि शिक्षित मतदारांमध्ये आपली एक 'ग्लोबल लीडर' म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा चाणाक्ष प्रयत्न मानला जात आहे.
हे ही वाचा : Election Survey: महाराष्ट्राच्या अगदी शेजारच्या राज्यात काँग्रेस देणार जबरदस्त टक्कर, BJP चा मार्ग कठीण; पण...
महाराष्ट्राचे राजकारण तापणार?
थोडक्यात सांगायचे तर, शिंदे यांनी लोककल्याणकारी योजनांचे जागतिक ब्रँडिंग करत एकाच वेळी अनेक राजकीय उद्दिष्टे साध्य केली आहेत. प्रशासकीय क्षमता सिद्ध करणे, बहुजन समाजाला साद घालणे आणि शिक्षित वर्गात स्वतःची प्रतिमा उंचावणे, या सर्व आघाड्यांवर त्यांनी या लंडन दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय फिल्डिंग लावली आहे. आता लंडनच्या थंड हवेत शिंदे यांना मिळालेले हे पुरस्कार महाराष्ट्राचे राजकारण किती तापवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
