कैलास पाटलांनी भर बैठकीत मंत्र्यांना घेरलं, अधिकाऱ्यांना झापलं, VIDEO
kailas patil : नांदेडमधील विभागीय बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी मराठवाड्यातील भारनियमनाचा मुद्दा उपस्थित केला. वीज अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कैलास पाटलांनी भर बैठकीत मंत्र्यांना घेरलं
अधिकाऱ्यांना झापलं, VIDEO
नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विभागीय बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील भारनियमनाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी वीज अधिकाऱ्यांना भारनियमनाबाबत थेट प्रश्न विचारत जाब विचारला. वीजेचा तुटवडा नसताना भारनियमन का केलं जात आहे, असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांकडून कधी कधी आपत्कालीन भारनियमन होत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, कैलास पाटील यांनी रोज भारनियमन होत असल्याचा दावा करत अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊ नये, असं सुनावलं.
'कधी कधी भारनियमन होतं, असं सांगून संभ्रम निर्माण करू नका'
बैठकीत कैलास पाटील यांनी धाराशिवसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भारनियमन होत असल्याचा मुद्दा मांडला. रोजच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावर अधिकाऱ्यांकडून काही वेळा आपत्कालीन भारनियमन होत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पाटील यांनी केवळ कधी कधी भारनियमन होतं, असं सांगून संभ्रम निर्माण करू नका, असं स्पष्टपणे सांगितलं. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यानेही कैलास पाटील सांगत आहेत ते बरोबर असल्याचं म्हटलं. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भारनियमन होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. गणपतीच्या काळात अशा प्रकारचं भारनियमन होणं चुकीचं असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं.
सणासुदीचे दिवस असल्याने भारनियमनाबाबत काळजी घेण्याची मागणी
यावेळी बीड जिल्ह्यातील भारनियमनाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदारांकडून भारनियमनाचा मुद्दा मांडला जात असेल तर त्यामध्ये तथ्य असल्याचं सांगत याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली. सुट्टीचे आणि सणासुदीचे दिवस असल्याने भारनियमनाबाबत काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. लोकप्रतिनिधी तळमळीने हा विषय मांडत असल्याने त्याची दखल घेण्याची सूचना मंत्र्यांसमोर करण्यात आली. भारनियमनाबाबतचा संदेश हेड ऑफिसमधून येतो का, असा सवालही करण्यात आला. त्यावर काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत भारनियमन केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र, मराठवाड्यात रोज संध्याकाळी भारनियमन होत असल्याचा दावा एका अधिकाऱ्याने बैठकीत केला.
दरम्यान, मराठवाड्यात कुठेही भारनियमन केलं जात नसल्याचं सांगणं चुकीचं असल्याचंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. पूर्ण मराठवाड्यात रोज संध्याकाळी आपत्कालीन भारनियमन होत असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी दुष्काळाची परिस्थिती, मुलांच्या परीक्षा आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींचा विचार करण्याची सूचना करण्यात आली. बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन पुढे भारनियमनाची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आलं. मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यात यापुढे अशा प्रकारचं भारनियमन होणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
