गोकुळमध्ये 5 शासन नियुक्त संचालक, आता बंटी पाटलांसाठी राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray on Satej D Patil : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरून त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोकुळमध्ये 5 शासन नियुक्त संचालक,
आता बंटी पाटलांसाठी राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray on Satej D Patil : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेत असतानाही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर भाजप महायुतीच्या नेतृत्वाखालील हसन मुश्रीफ यांच्या आघाडीला 12 जागा मिळाल्या. मात्र, त्यानंतर सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. या निर्णयावरून राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष असून, खालपासून वरपर्यंत सत्तेत असतानाही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जगात सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढत असल्याचे हे एकमेव उदाहरण असेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनलचे 12 आणि सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आले. ही निवडणूक बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने झाली होती. असे असताना सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करून त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याची गरज काय, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : Personal Finance: ना सोने खरेदी, ना जमीन... फक्त डेटा सेंटर क्षेत्रातून कमाईची मोठी संधी!
'गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आपली तत्त्वे बाजूला ठेवली'
गोकुळमध्ये सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजपने आपली तत्त्वे बाजूला ठेवली आहेत. महाराष्ट्रात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ असल्याचे चित्र असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजप सत्तेत असताना लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढेल आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळेल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय देशात अतिरेकी हल्ले झाले, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर दहशतवादापासून देश वाचवण्यासाठीही भाजप मोर्चे काढेल. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही मोर्चे काढतील, असा उपरोधिक उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणे बंद करावे. भाजपने कोणत्याही मार्गाने बहुमत मिळवले, तरी विरोधी पक्षांनी गेली 12 वर्षे ते सहन केले आहे. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली असेल, तर भाजपनेही ते सहन करायला शिकले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावर जनतेच्या न्यायालयात जाण्यासाठीही काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
