सुनेत्रा पवारांवर झालेल्या टिकेनं रान पेटलं, 'गुंगी गुडिया' टिकेचा इतिहास आला समोर
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसकडून गुंगी गुडिया अशी टिका केल्यानं राज्यातील वातावरण पेटलं आहे. गुंगी गुडिया यापूर्वी इंदिया गांधी यांच्याबाबत देखील वापरण्यात आलेला शब्द होता, त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवारांवर काँग्रेसकडून झालेल्या टिकेनं रान पेटलं
गुंगी गुडिया अशी एकेकाळी इंदिरा गांधीवर झाली होती टिका
Sunetra Pawar : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची चांगलीच ठिणगी पडली आहे. बीड दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संबंधित व्हिडिओत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काहीही बोलताना दिसत नव्हत्या, मात्र आमदार धनंजय मुंडे बोलताना दिसत आहेत. याचवरून काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना गुंगी गुढिया म्हणत डिवचलं आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत, सुनेत्रा पवार, अजून किती दिवस "गुंगी गुडिया" बनून राहतील? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
सुनेत्रा पवारांवर काँग्रेसकडून झालेल्या टिकेनं रान पेटलं
काँग्रेसच्या या टिकेला आता राज्यातून प्रत्युत्तर दिले जात आहे. "काँग्रेस ही लोकांपासून आता दूर गेलेली आहे. इंदिरा गांधींवर विरोधकांनी टिका केली होती. त्याच पंतप्रधान झाल्याचा इतिहास देखील आहे. काँग्रेस चांगल्या लोकांच्या हाती नाही, त्यामुळे त्यांना पराभव पचवता येत नाही असे हे लोक आहेत," अशा शब्दांत सुनेत्रा पवारांवर महाराष्ट्र काँग्रेसनं केलेल्या टिकेला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर आता सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार म्हणाले की, "मी केवळ आईच्या मागे उभा, नाहीतर स्वत:च्या कर्तुत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उभा आहे."
जय पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
"माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत सहन केली जाऊ शकत नाही." राजकारण हे विचारांचे आणि धोरणांचे असावे, महिलांच्या अपमानाचे नव्हे, असे सांगत त्यांनी लोकशाही मूल्यांचे भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मी केवळ आईच्या मागे उभा, नाहीतर स्वत:च्या कर्तुत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिला पाहिजे.
