‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…
Shiv Sena split News: शिवसेना UBT पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिले आहे. शिवसेना UBT हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष असून कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, देऊ नये.
ADVERTISEMENT

Shiv Sena UBT: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटून वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चा रंगत असतानाच उद्धव ठाकरे गटाने मोठी आणि महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. संभाव्य फुटीच्या वृत्तांना पार्श्वभूमी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन सादर करत संसदेतील पक्षाच्या मान्यतेबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
विशेष म्हणजे, काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच मध्यरात्री हे पत्र जारी करण्यात आले. त्यामुळे या पत्राकडे केवळ प्रशासकीय पत्रव्यवहार म्हणून नव्हे, तर संभाव्य राजकीय घडामोडींना दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे.
नेमकी काय आहे मागणी?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या निवेदनात संसदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे.
