पुतिन यांच्याविरोधात बंड, मोदींना इशारा; शिवसेनेने (UBT) सांगितला भारतातील वॅग्नर ग्रुप
भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले, असे शिवसेनेने म्हटले आहे.
ADVERTISEMENT
Narendra Modi Vs Uddhav Thackeray : बंडाचं निशाण फडकावलेल्या वॅग्नर ग्रुपसोबत तह करण्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना यश आलं. पण, या बंडाने पुतिन हादरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. रशियातील वॅग्नर ग्रुपच्या बंडाकडे लक्ष वेधत शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला इशारा दिला आहे. विरोधी पक्षाची एकी भाजपसमोर मोठं आव्हान असल्याचा दावाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात शिवसेनेने (UBT) म्हटलं आहे की, “पाटण्यात शुक्रवारी 17 प्रमुख राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक झाली. भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. लोकशाहीच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे. या बैठकीवर गृहमंत्री अमित शाह यांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिलीच आहे. अमित शाह म्हणाले, ‘विरोधक फोटोसाठी एकत्र जमले व कितीही विरोधक एकत्र आले तरी भाजप 300च्या वर जागा जिंकेल हे नक्की.’ शाह यांचे हे वरवरचे अवसान आहे.”
फोटोसाठी मोदींनी मंत्र्यांना ढकलून दिले -ठाकरे
“देशात ‘फोटोप्रेमी’ कोण? हे 140 कोटी जनता रोज पाहत आहे. फोटो किंवा प्रसिद्धीच्या आड येणाऱ्या आपल्याच नेत्यांना, मंत्र्यांना कसे ढकलून दूर केले जाते हे मोदी यांनी अनेकदा दाखवून दिले. भाजपचे सर्व कार्यक्रम जनता किंवा देशासाठी नसून फोटोसाठीच असतात यात नव्याने सांगावे असे काय आहे? राहता राहिला प्रश्न 2024 ला काय निकाल लागेल याचा. या वेळचा निकाल ‘ईव्हीएम’ लावणार नाही, जनताच लावेल. ‘ईव्हीएम’चा घोटाळा झाल्याचा संशय आला तर मणिपूरसारखी परिस्थिती त्या वेळी देशात निर्माण होईल. इतका उद्रेक जनतेच्या मनात साचला आहे.”
हे वाचलं का?
सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
“विरोधक पाटण्यात फोटो काढण्यासाठी जमले हे मान्य केले तरी त्यांचा इतका धसका का घ्यावा? कालपर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘नड्डा’ वगैरे लोक ‘अब की बार भाजप 400 पार’ अशा गर्जना करीत होते. पाटण्याच्या फोटोसेशननंतर स्वतः अमित शाह म्हणतात, ‘आम्ही 300 जागा जिंकू.’ म्हणजे विरोधकांच्या एका फोटो सेशननेच भाजपच्या 100 जागा कमी केल्या व हीच विरोधकांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे. भारतीय जनता पक्ष हा हवेने भरलेला फुगा आहे. तो जरा जास्तच फुगवला आहे. सत्ता, मत्ता आणि प्रसिद्धी यामुळे लोकांत भ्रम निर्माण करता येतो, पण लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजवता येत नाही.”
हेही वाचा >> शरद पवारांच्या बेईमानीचा किस्सा अन् ठाकरेंना आव्हान, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मोदी, शाह यांनी विजयाचे ढोल वाजविण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी भाडोत्री लोक मोठ्या प्रमाणात निर्माण केले. हे भाडोत्रीच त्यांच्यावर पहिला वार करतील. याचे प्रात्यक्षिक सध्या रशियात घडत आहे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी-शाहदेखील देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशाची संपत्ती विकली.”
ADVERTISEMENT
पुतिन यांच्याच लष्कराने पुकारले बंड
“आज पुतीन यांच्या देशात काय घडत आहे? पुतीन यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’ या खासगी लष्करानेच पुतीनविरुद्ध बंड पुकारले. पुतीन यांची हुकूमशाही राजवट उलथवून रशियात सत्तापालट करण्यासाठी पुतीन यांचेच हे खासगी लष्कर रस्त्यावर उतरले होते. मॉस्कोचा ताबा घेण्यासाठी हे लष्कर पुढे सरकले होते. रशियाने म्हणजे पुतीन यांनी युक्रेनवर निर्घृण हल्ले केले. एक देश बेचिराख केला. विजयाचा मद तेव्हा पुतीन यांना चढला. जागतिक युद्धाच्या घोषणा केल्या, पण स्वतःच्या खुर्चीखालीच बॉम्बची वात पेटली आहे याची भनक पुतीनसारख्या हुकूमशहाला लागली नाही. पुतीन यांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल’, अशी शपथ वॅग्नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी आधी घेतली होती.”
ADVERTISEMENT
“प्रिगोझिन यांनी जाहीर केले होते की, ‘पुतीन देश संपवायला निघाले आहेत. पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे रशियात अराजक माजले आहे. आमच्याकडे हजारो लोकांची फौज आहे. आम्ही पुतीन यांना हटवणारच!’ पुतीन हे स्वतःस बलाढ्य मानत होते. देशातील सर्व यंत्रणांचे मालकच बनून ते राज्य करीत होते. विरोधकांचा त्यांनी थेट काटाच काढला. सरळ ठार केले किंवा तुरुंगात डांबले. रशियाची जनता महागाई, बेरोजगारी, अंतर्गत कलह यामुळे मरणयातना भोगत असताना राष्ट्राध्यक्ष पुतीन हे युद्ध, मौजमजेत दंग होते व शेवटी त्यांचेच सैन्य त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले.”
भारतातही तेच सुरू आहे…
“रशियातील निवडणुका हा गेल्या अनेक वर्षांत फक्त फार्स होता. पुतीन यांचे लोक गैरमार्गाचा वापर करून निवडून आले व त्यांनी संसदेत ताबा मिळविला. आता आपल्याला कुणाचेच भय नाही व परमेश्वराकडून अमृतच प्राप्त केल्याने अमर आहोत या गुंगीत असताना पुतीन यांच्या विरोधात बंड झाले. पुतीन यांचे म्हणणे असे की, ‘वॅग्नर संघटनेने पाठीत खंजीर खुपसला, देशद्रोह केला.’ पुतीन यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. हुकूमशहा आपल्या सोयीप्रमाणे देशद्रोहाची व्याख्या करत असतो. हिंदुस्थानातही तेच सुरू आहे व लोकांच्या मनात क्रांतीची भावना रुजत आहे.”
हेही वाचा >> NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली
“भाजपने सत्ता टिकविण्यासाठी अनेक बाजारबुणगे म्हणजे मिंधे आपल्याभोवती रक्षक म्हणून उभे केले. उद्या हेच लोक सगळ्यात आधी मोदी-शाहांच्या पाठीत वार करून रस्त्यावर उतरतील. पुतीन यांच्या बाबतीत तेच घडले. अमेरिकेसह सर्व जगाने पुतीन यांना युद्ध करून युव्रेन बेचिराख करू नये असे आवाहन केले, पण मस्ती व धुंदीतल्या पुतीन यांनी ऐकले नाही. त्यामुळे जगात इतरही ‘चाणाक्ष’ लोक आहेत व तेही हुकूमशाहीच्या गडास सुरुंग लावू शकतात हे आता पुतीनविरोधी बंडामुळे दिसले.”
“पुतिन असो की मोदी… बंडाचा सामना करावाच लागतो”
“वॅग्नर ग्रुपचे सशस्त्र सैन्य चिरडून टाकू असा आव पुतीन यांनी आणला, पण त्यांना ते जमले नाही. शेवटी मध्यस्थाकरवी वॅग्नर ग्रुपच्या अध्यक्षांचे मन वळवून त्यास बेलारूस येथे पाठवले. म्हणजे वॅगनर ग्रुपपुढे माघार घेतली ती श्रीमान पुतीन यांनी. पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅग्नर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो. पुतीन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो.”
“हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘वॅग्नर’ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. मोदी बायडेन यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले. अत्यंत चुकीच्या इंग्रजीत भाषण करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले. हा अट्टाहास फक्त न्यूनगंड असलेली व्यक्तीच करू शकते. ‘व्हाईट हाऊस’च्या पत्रकार परिषदेत देशातील लोकशाही, संविधान, अल्पसंख्याकांवरील हल्ले यावर विचारलेल्या एकाच प्रश्नाने मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली हे स्पष्ट दिसते. त्यामुळे वॉशिंग्टनचे त्यांचे फोटोसेशन काळवंडून गेले. त्यात पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅग्नर ग्रुप’ एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘वॅग्नर ग्रुप’ने तोच इशारा दिला!”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT