संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रात एकच शिवसेना, गट वगैरे काही नाही..

वाचा सविस्तर बातमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
What Sanjay Raut Said About Shivsena Split ?
What Sanjay Raut Said About Shivsena Split ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मातोश्री या ठिकाणी जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना शिवसेनेत दोन गट पडल्यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात शिवसेना एकच, गट वगैरे काहीही नाही.

काय म्हटलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी?

महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे. गट वगैरे काहीही नाही. शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील या विश्वासामुळेच मी तुरुंगात असूनही निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी मला दहावेळा तुरुंगात जावं लागलं तरीही जाईन. पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला ४० वर्षांमध्ये भरभरून दिलं आहे. मी पक्षाशी बेईमानी करणारा नाही. स्वतःची सुटका करून घ्यायची म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

.

२१ जूनला शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचा गट वेगळा झाला. महाराष्ट्रात सत्तांतरही झालं. या सगळ्या दरम्यान दोन्ही गटांना वेगळी नावंही मिळाली. याचसंदर्भात प्रश्न विचारला असता शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे गट वगैरे काहीही नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांवर उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला. संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जिवलग मित्र आहे. मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळं स्पष्ट झालं आहे. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत हे स्पष्ट आहे. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु आहे

संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंद याशिवाय दुसरी प्रतिक्रिया नाही

संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदानंतर दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदाबरोबरच संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in