'ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण...', ठाकरेंनी मानले पवारांचे आभार, राज ठाकरेंबद्दल मौन

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरे, शरद पवारांनी केलं आवाहन
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक : उद्धव ठाकरे, शरद पवार
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक : उद्धव ठाकरे, शरद पवार

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशीच भूमिका मांडली. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी फक्त शरद पवारांचेच आभार मानलेत.

राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यांनी एका पत्राद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट करताना ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या भूमिकेची चर्चा होत असतानाच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एक ते दीड वर्षांचा कालावधी राहिला असून, निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केलं.

दोन नेत्यांच्या भूमिकांनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका समोर आलीये. मात्र त्यांनी फक्त शरद पवारांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलंय.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक : उद्धव ठाकरे, शरद पवार
'...तर मी काही बोललो नसतो'; गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत शरद पवार अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काय बोलले?

अंधेरी पूर्व : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल काय म्हटलंय?

शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात, 'राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेनं पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं, हे प्रचंड वेदना देणारं असतं. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबियांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्यानं लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणं पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेनं ऋतुजाताईंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला.'

'त्यांना (ऋतुजा लटके) निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवानं विरोधकांकडून झाला, मात्र न्याय देवतेनं न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेलं आहे. त्याची जपणूक शिवसेनेनं सदैव केली. स्व. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेनं समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्यानं कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही', असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक : उद्धव ठाकरे, शरद पवार
राज ठाकरेंना भाजपनं पत्र लिहायला सांगितलं?; अरविंद सावंतांचं मनसे अध्यक्षांच्या मौनावर बोट

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलं आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचं कार्य करेल अशी मला खात्री आहे', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीये.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in