
7500 Gram Panchayats Election in Maharashtra: मुंबई: राज्यात (Maharashtra) आज (18 डिसेंबर) तब्बल 7500 ग्रामपंचायतींसाठी मतदान (7500 Gram Panchayats Voting) होत आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश ग्रामीण भागात मतदानाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Election) या पॅनल पद्धतीने होत असल्या तरीही राज्यातील ग्रामीण भागात आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी सर्वच प्रमुख पक्ष हे उमेदवार आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्व प्रकारची रसद पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवून प्रत्येक पक्ष हा कसोशीने प्रयत्न करत असल्याचं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. (voting battle in as many as 7500 gram panchayats in maharashtra who will beat the bet)
आज रविवार असल्याने अनेक ग्रामस्थ हे हिरीरीने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात मतदानाचा टक्का हा अधिक असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी देखील मतदान होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा थेट सरपंचाची निवड हा नियम लागू केला. ज्यामुळे सदस्य निवडीसोबतच सरपंच देखील आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे.
आज सकाळी 7.30 वाजे पासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरु असणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात फक्त 3 वाजेपर्यंतच मतदान होईल. त्यासाठी अनेक नक्षली भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्यामुळे येथील नागरिकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय मतदान करता येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी निवडणूक?
एकूण 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान
सिंधुदुर्ग - 325
सातारा - 319
बीड - 704
अहमदनगर - 203
औरंगाबाद - 219
भंडारा - 363
अकोला -266
अमरावती - 257
बुलढाणा - 279
चंद्रपूर -59
धुळे -128
गडचिरोली - 27
गोंदिया - 348
हिंगोली - 62
जळगाव - 140
जालना - 266
कोल्हापूर - 475
लातूर - 351
नागपूर - 237
नंदूरबार - 123
उस्मानाबाद - 166
पालघर - 63
परभणी - 128
पुणे - 221
सांगली - 452
सोलापूर - 189
ठाणे - 42
वर्धा - 113
वाशिम - 287
यवतमाळ - 100
नांदेड - 181
नाशिक - 196
एकूण 32 जिल्ह्यात या ग्रामपंचायत निवडणुका होणार असून त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कोणाचं वर्चस्व कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.