IPL 2021 Explainer : ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी, निर्णय किती बरोबर किती चूक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एखाद्या खेळाडूचं आयुष्य हे ५ महिन्यांच्या कालावधीत किती बदलू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषभ पंत. फार दूर जायला नको २०२० च्या अखेरीस टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा आठवून पहा. पहिल्या एक-दोन टेस्ट मॅचमध्ये ऋषभने विकेटकिपींग करत असताना काही सोपे कॅच सोडले होते. नेहमीप्रमाणे यानंतर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला. परंतू सिडनी टेस्ट पासून ऋषभने आपल्या खेळात जो काही बदल केलाय तो केवळ कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या शेवटच्या दोन टेस्ट मॅच आपण फक्त ऋषभ पंतमुळे जिंकलो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यानंतर इंग्लंडच्या सिरीजमध्येही पंतने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

इंग्लंडविरुद्धची सिरीज आटोपल्यानंतर आयपीएलच्या चौदाव्या सिझनचे वेध लागले आहेत. ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे संघातलं स्थान गमवावं लागलं. यानंतर दिल्लीचा कॅप्टन होणार तरी कोण अशा चर्चा सुरु असताना आणि शर्यतीत शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्टिव्ह स्मिथ यांच्यासारखे खेळाडू असताना दिल्ली कॅपिटल्सने निवड केली ती म्हणजे ऋषभ पंतची. ५ महिन्यांपूर्वी लोकांच्या टीकेचा धनी ठरणारा खेळाडू ५ महिन्यांनंतर आयपीएलसारख्या महत्वाच्या स्पर्धेत एका संघाचा कॅप्टन होतो. ऋषभ पंतचा हा प्रवास खरंच कौतुकास पात्र आहे.

परंतू संघात सिनीअर खेळाडू असताना त्यांना डावलून पंतसारख्या नवख्या, कॅप्टन्सीचा अनुभव नसलेल्या खेळाडूला कॅप्टन करणं कितपत योग्य असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. त्यातच पंत हा एका दुधारी तलवारीसारखा आहे…जर शत्रूपक्षावर बरसला तर दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पण चुकून तो घाव आपल्याच संघाला लागला तर दिल्लीची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन करण्याचा निर्णय किती योग्य आणि किती अयोग्य हे आपण तपासून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IPL 2021 : जोश हेजलवूडची माघार, CSK ला धक्का

ऋषभ हा त्याच्या दमाचा खेळाडू आहे. फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये लागणारी आक्रमकता त्याच्याकडे आहे. मिडल ऑर्डरमध्ये खेळत असताना जिकडे टीमला सिक्स-फोरची गरज असते तिकडे ऋषभ तुम्हाला अपेक्षित निकाल देऊ शकतो. बचेंगे तो और भी लढेंगे हा अप्रोच ऋषभ आपल्या बॅटिंगमध्ये ठेवत नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर स्पिनरला पुढे येऊन सिक्स मारणारा, जेम्स अँडरसनसारख्या वर्ल्डक्लास बॉलरच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्विप खेळण्याची हिंमत हा फक्त ऋषभ पंतच करु शकतो. त्याचे फटके पुस्तकी नाहीयेत….समोरच्या बॉलरला आपली भीती वाटली पाहिजे अशी बॅटींग ऋषभ करतो. आता त्याच्या बॅटींगच्या तंत्राबद्दल अनेकांची दुमत असू शकतात. पण टीम इंडियात मिडल ऑर्डरमध्ये ऋषभ पंत आहे…म्हणून ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपली सेकंड इनिंग लवकर डिक्लीअर न केल्याचं आपण पाहिलं आहे. कारण पंतला मधल्या फळीत सूर गवसला तर तो मॅचचं चित्रच बदलले ही भीती गेल्या काही महिन्यांमध्ये समोरच्या टीममध्ये निर्माण करण्यात ऋषभ यशस्वी झालाय. त्यामुळे आयपीएलमध्ये अशाच प्रकारे आक्रमक वृत्तीचा, निडर असा तरुण खेळाडू दिल्लीचं नेतृत्व करणार असेल तर ते कधीही चांगलंच ठरेल.

ADVERTISEMENT

IPL 2021 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन प्लेअरची माघार, SRH च्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एंट्री

ADVERTISEMENT

ऋषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी जाण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे…त्याचा गेमवर पडणारा इम्पॅक्ट. पंतच्या व्यतिरीक्त दिल्लीकडे पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्टिव्ह स्मिथ, रविचंद्रन आश्विन असे अनेक ऑप्शन होते. परंतू पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या कामगिरीतल्या सातत्याचा मुद्दा लक्षात घेता त्यांना कॅप्टन्सी मिळेल याची शक्यता कमीच होती. अजिंक्य रहाणेचं अजुनही दिल्लीच्या संघातलं स्थान निश्चीत नाही. अजिंक्यला दिल्लीचं कॅप्टन करायचं म्हणलं तर संघाचा पूर्ण समतोल बिघडण्याची शक्यता होती. त्यातच दिल्लीत अजिंक्यला कॅप्टन करायचं तर त्याला ओपनिंगला पाठवण्याशिवाय दिल्लीकडे पर्याय नव्हता. मधल्या फळीत अजिंक्य म्हणावी तशी कामगिरी करु शकेल याची खात्री नव्हती. त्यामुळे अशा परिस्थितीत एका प्लेअरसाठी संघाचा बॅलन्स बिघडवून घेण्यापेक्षा ऋषभ पंतचा पर्याय कधीही जास्त योग्य ठरतो. स्टिव्ह स्मिथ आणि रविचंद्रन आश्विन हे देखील चांगले पर्याय दिल्लीकडे उपलब्ध होते…परंतू कॅप्टन म्हणून त्यांच्या यशाचं गणित हे बेरजेपेक्षा वजाबाकीचचं जास्त आहे. याव्यतिरीक्त ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या खांद्यावर एक जबाबदारी दिल्यास त्याच्या मदतीला आणखी सिनीअर खेळाडू संघात आहेत. भविष्याच्या दृष्टीकोनातून ऋषभला कॅप्टन्सीसाठी संधी दिल्यानंतर त्याची कामगिरी कशी होते हे तपासायला दिल्लीकडे खूप चांगली संधी होती, जिचा त्यांनी चांगला वापर केला असं म्हणायला वाव आहे.

पण या झाल्या ऋषभच्या जमेच्या बाजू…कॅप्टन्सी म्हटलं की जबाबदारीचं ओझ अंगावर येतं. या दृष्टीकोनातून ऋषभला सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागणार आहे ते म्हणजे आपल्या विकेटकिपींगवर. विकेटकिपर हा टीमचा अर्धा कॅप्टन असतो असं म्हणतात. स्टम्पमागून मॅचचं पारडं कोणत्या दिशेला झुकतंय याचा अंदाज विकेटकिपरला येतो. गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभने विकेटकिपींगमध्ये सुधारणा केली असली तरीही कॅप्टन्सीची जबाबदारी पेलवून तो कशी विकेटकिपींग करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आजही पंतच स्टम्पमागे बॉल योग्य पद्धतीने कॅरी करत नाही, अनेक बॉल हातातून सुटतात, DRS चे अनेक अंदाज ऋषभला कळत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखाद्या महत्वाच्या मॅचमध्ये ऋषभकडून काही चुका झाल्या तर सगळ्यात आधी पराभवाचं खापर हे त्याच्यावर येणार. पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं आणि त्या अपयशाचं खापर पंतवर फोडलं गेलं तर त्याच्यातली उमेद पुन्हा एकदा खालावली जाऊ शकते. आयपीएल २०२० मध्ये पृथ्वी शॉच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण सर्वांनी पाहिलंच आहे. ऋषभ पंतच्या बाबतीत असं न होऊ देण्याची जबाबदारी दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटची असणार आहे.

याचसोबत ऋषभला बॅटींगमध्ये उतावळेपणा करुन चालणार नाही. सध्या ऋषभ चांगल्या फॉर्मात आहे म्हणून काही प्रश्न नाही, पण बॅटींग करत असताना तो काही शॉट्स हे ज्या बेजबाबदार पद्धतीने खेळतो हे त्याला आता थांबवावं लागणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये मधल्या फळीतल्या बॅट्समनची जबाबदारी मोठी असते. सुरुवातीच्या फळीतले बॅट्समन लवकर आऊट झाले तर थोडावेळ मैदानात टिकून इनिंग सावरुन मग फटकेबाजी करावी लागते. संघाला सावरुन घेण्याचं हे महत्वाचं काम ऋषभला दिल्लीत करावं लागणार आहे. संघाला गरज असताना जर ऋषभ आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही तर दुर्दैवाने पुन्हा त्याला ही संधी कदाचीत मिळणार नाही. एखाद्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी ही फार कमी वेळा मिळत असते. ऋषभला ती मिळाली आहे आणि त्याच्यात ती निभावण्याची ताकदही आहे. फक्त गरजेनुसार त्याला आपल्या खेळात थोडीशी प्रगल्भता आणावी लागेल.

जाता जाता एकच सांगेन की सध्याच्या टीम इंडियात असलेल्या सिनीअर प्लेअर्सचे उत्तराधिकारी शोधण्याची हीच वेळ आहे. विराट-रोहित-इशांत-शमी हे आता तिशीच्या उंबरठ्यावर आहेत तर काहींनी तिशी ओलांडली आहे. त्यामुळे संघातील तरुण खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्याची हीच ती वेळ आहे. काही जण ही संधी चांगल्या पद्धतीने निभावतील तर काही जण पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरतील. पण ही एक प्रोसेस आहे हे फॅन्स म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. एखाद्या संधीचं सोनं झालं नाही म्हणून तो प्लेअर मोडीत निघत नाही. त्याला गरज असते आपल्या पाठींब्याची. गेल्या ५ महिन्यांमध्ये ऋषभने फॅन्स म्हणून आपला पाठींबा मिळवण्याइतकी कामगिरी केली आहे यात काही वादच नाही. त्यामुळे ही नवीन इनिंग ऋषभ कशी खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT