
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सलाही यंदाच्या हंगामात अजुनही विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईवर मात करत आपले इरादे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत. विजयासाठी मुंबईने दिलेलं १५२ धावांचं आव्हान बंगळुरुने ७ विकेट्स राखत पूर्ण केलं.
पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने या सामन्यात आश्वासक कामगिरी केली. इशान किशन आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात असताना मुंबईचा संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करेल असं वाटत असतानाच हर्षल पटेलने रोहित शर्माला आऊट केलं.
यानंतर मुंबईच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, पोलार्ड, रमणदीप सिंग हे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले.
त्यामुळे आश्वासक सुरुवात केल्यानंतरही मुंबईचा संघ ६ बाद ७९ अशा खडतर अवस्थेत सापडला. यानंतर भरवशाचा सूर्यकुमार यादवने जयदेव उनाडकटला हाताशी धरत एक बाजू लावून धरली. अखेरच्या काही ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत सूर्यकुमारने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सूर्यकुमारच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने १५१ धावांचा टप्पा गाठला. सूर्यकुमारने ३७ बॉलमध्ये ५ फोर आणि ६ सिक्स लगावत नाबाद ६८ धावा केल्या. RCB कडून पटेल आणि हसरंगा यांनी प्रत्येकी २-२ तर अक्षदीपने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल RCB ने ही चांगली सुरुवात केली. सलामीवीर अनुज रावत आणि फाफ डु-प्लेसिसने RCB ला अर्धशतकी भागीदारी करुन दिली. मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सना बंगळुरुचे फलंदाज ताकास तूर लागू देत नव्हते. जयदेव उनाडकटने डु-प्लेसिसला आऊट करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर अनुज रावतने विराट कोहलीच्या साथीने भागीदारी रचत आपलं अर्धशतक साजरं केलं आणि मुंबईच्या आव्हानातली हवाच काढून घेतली.
अर्धशतक झळकावल्यानंतर अनुज रावतला बाद करण्यात मुंबईला यश आलं. मैदानावर स्थिरावलेला विराट कोहलीही ठराविक अंतराने माघारी परतला. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. ग्लेन मॅक्सवेलने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.