आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात युवा फलंदाज पृथ्वी शॉकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून अनुभवी अजिंक्य रहाणे यंदा पृथ्वीच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक खेळणार आहे.
असा असेल मुंबईचा रणजी करंडक स्पर्धेसाठीचा संघ –
पृथ्वी शॉ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आरर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्राडे, धवल कुलकर्णी, मोहीत अवस्थी, प्रिन्स बदीयानी, सिद्धार्थ राऊत, रोस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर
अजिंक्य रहाणेचं गेल्या काही वर्षांमध्ये फॉर्मात नसणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या पराभवानंतर अजिंक्यचं भारतीय संघातलं स्थान आता धोक्यात आलंय. आगामी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेआधी स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी अजिंक्यकडे रणजी करंडकाच्या निमीत्ताने चालून आली आहे.
यंदा मुंबईचा समावेश हा गतविजेत्या सौराष्ट्रासोबत करण्यात आला असून यंदा मुंबईला गोवा आणि ओडीशाचाही सामना करायचा आहे. यंदाचा रणजी करंडक हा दोन टप्प्यात खेळवला जाणार आहे.
१७ फेब्रुवारीपासून मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्याला सुरुवात होईल यानंतर २४ फेब्रुवारीला मुंबई आणि गोव्याचा सामना रंगेल. यानंतर ३ मार्चला मुंबई ओडीशाशी दोन हात करेल. त्यामुळे बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुंबईला सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे. रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा आयपीएल नंतर खेळवला जाईल.