T-20 World Cup : सलग दुसऱ्या सराव सामन्यात भारत विजयी, ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने मात

रोहित शर्मा फॉर्मात परतला, भारतासाठी आनंदाची बातमी
T-20 World Cup : सलग दुसऱ्या सराव सामन्यात भारत विजयी, ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने मात
फोटो सौजन्य - BCCI

टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघाचा चांगला सराव झाला आहे. २४ तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी भारताने पहिल्या दोन सराव सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंडवर मात केल्यानंतर भारताने आज ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून मात केली आहे.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू कांगारुंची सुरुवात अतिशय अडखळती झाली. आश्विन आणि जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ३ फलंदाजांना झटपट गुंडाळलं. डेव्हिड वॉर्नर, कॅप्टन फिंच आणि मिचेल मार्श झटपट आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ११ अशी झाली होती. परंतू यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ग्लेन मॅक्सवेलने भारतीय स्पिनर्सवर हल्लाबोल करत काही चांगले फटके खेळले.

राहुल चहरने मॅक्सवेलला क्लिन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. यानंतर स्टिव्ह स्मिथने स्टॉयनिसच्या साथीने आणखी एक महत्वपूर्ण भागीदारी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भुवनेश्वर कुमारने त्याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला मोक्याच्या क्षणी आणखी एक धक्का दिला. स्मिथने ४८ बॉलमध्ये ७ चौकार लगावत ५७ धावा केल्या. यानंतर स्टॉयनिसने अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन संघाला १५२ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून आश्विनने २ तर भुवनेश्वर कुमार, रविंद्र जाडेजा आणि राहुल चहरने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल भारताने या सामन्यातही आश्वासक सुरुवात केली. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत चांगली फटकेबाजी केली. विशेषकरुन फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रोहितने या सामन्यात चौफेर फटकेबाजी केली. लोकेश राहुलनेही त्याला उत्तम साथ दिली. पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची पार्टनरशीप झाल्यानंतर लोकेश राहुल ३९ रन्सवर आऊट झाला. दरम्यान रोहित शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

४१ बॉलमध्ये ५ चौकार आणि ३ षटकार लगावत रोहितने ६० धावा केल्या. भारताला विजयासाठीचं लक्ष्य अवाक्यात आल्यानंतर रोहितने विश्रांती घेत पांड्याला फलंदाजीची संधी दिली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in