Tokyo Olympics 2020 : Neeraj Chopra च्या भाल्याने घेतला सुवर्णपदकाचा वेध, भारताच्या खात्यात पहिलं Gold Medal

अभिनव बिंद्रानंतर गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू
Tokyo Olympics 2020 : Neeraj Chopra च्या भाल्याने घेतला सुवर्णपदकाचा वेध, भारताच्या खात्यात पहिलं Gold Medal

टोकियो ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे. २००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं, त्यानंतर सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

पात्रता फेरीत ८५ मी. चं अंतर पार केलेल्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडाकेबाज सुरुवात केली. ८७.०३ मी. लांब भाला फेकत नीरजने पहिल्या राऊंडनंतर आघाडी घेतली. नीरज चोप्रासाठी आव्हान ठरु शकणाऱ्या जर्मनीच्या ज्युलिअन वेबर आणि जोहान्स वेटेर यांनीही अनुक्रमे ८५.३० आणि ८२.५२. लांब भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्या प्रयत्नात ८२ मी. चं अंतर पार करत चौथं स्थान पटकावलं. परंतू चेक रिपब्लीकच्या जाकुबने ८३ मी. लांब भाला फेकत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्राची बरोबरी करण्यात कोणालाच यश आलं नाही.

दुसऱ्या राऊंडनंतर नीरज चोप्राने आपल्या कामगिरीत सुधारणा करत ८७.५८ मी. लांब भाला फेकत आपली आघाडी आणखी मजबूत केली. दुसऱ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या ज्युलिअन वेबरची कामगिरीही फारशी चांगली झाली नाही त्याने ७७.९० मी. लांब भाला फेकला. जर्मनीच्या जोहान्स वेटेर आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीम यांचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरवण्यात आला ज्यामुळे नीरजचं पहिलं स्थान अधिकच भक्कम झालं. चेक रिपब्लिकच्या जाकुबचाही दुसरा प्रयत्न फोल ठरला.

तिसऱ्या राऊंडमध्ये आत्मविश्वासाने सुरुवात करायला गेलेल्या नीरज चोप्राला धक्का बसला. नीरजचा भाला तिसऱ्या राऊंमध्ये ७६.७९ मी. चं अंतर पार करु शकला. त्यातच चेक रिपब्लीकच्या व्हितेझ्लाव्ह वेसेलीने ८५.४४ मी. लांब भाला फेकत नीरज चोप्राला आव्हान दिलं. तिसऱ्या राऊंडमध्ये चेक रिपब्लीकच्या खेळाडूत आणि नीरज चोप्रामध्ये अवघ्या २ गुणांचं अंतर होतं. तिसऱ्या प्रयत्नात पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही ८४.६२ मी. लांब भाला फेकत पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम ठेवलं. तिसऱ्या राऊंडअखेरीसही नीरज चोप्राने आघाडी कायम ठेवली.

तिसऱ्या राऊंडअखेरीस १२ पैकी ४ खेळाडू पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेले. उरलेल्या ८ खेळाडूंपैकी चौथ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या ज्युलिअन वेबरने ८३.१० मी. लांब भाला फेकत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यातच नीरज चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल ठरवण्यात आल्यामुळे उत्सुकता आणखीनच वाढली गेली.

पाचव्या प्रयत्नात रिपब्लीक ऑफ मोल्डावाच्या खेळाडूने ८३ मी. लांब भाला फेकत चांगली सुरुवात केली. चेक रिपल्बिकच्या जाकुबने पाचव्या प्रयत्नात ८६.६७ मी. लांब भाला फेकत नीरज चोप्राला आव्हान दिलं. तळातल्या स्थानावर असलेल्या याकुबने या कामगिरीसह जर्मनीच्या खेळाडूला खाली ढकलत रौप्यपदकावर दावेदारी केली. जर्मनीच्या ज्युलिअन वेबरने ८५.१५ मी. लांब भाला फेकला पण तो चौथ्या स्थानावर राहिला. नीरज चोप्रा आपल्या पाचव्या प्रयत्नातही आश्वासक खेळी करु शकला नाही. त्याचा पाचवा प्रयत्नही फाऊल ठरवण्यात आला.

अखेरच्या राऊंडमध्ये आपलं गोल्ड मेडल कायम राखण्यासाठी नीरज चोप्राला चेक रिपब्लीकच्या दोन्ही खेळाडूंचा सामना करायचा होता. जाकुब आणि वितेझ्लाव्ह या दोन खेळाडूंनी चौथ्या आणि पाचव्या राऊंडअखेरीस नीरजला कडवं आव्हान दिलं. अखेरच्या राऊंडमध्ये फिनलँडच्या खेळाडूने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानच्या अर्शदचा अखेरचा प्रयत्न फाऊल ठरवण्यात आला. जर्मनीचा अनुभवी ज्युलिअन वेबरही अखेरच्या प्रयत्नात कांस्यपदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला. चेक रिपब्लीकच्या वेलेत्झेव्हचा अखेरचा प्रयत्न फाऊल ठरला आणि नीरज चोप्राच्या मार्गातला एक धोका कमी झाला. पाठोपाठ जाकुबचा प्रयत्नही फाऊल ठरवण्यात आल्याने नीरज चोप्राच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in