WTC Final : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाची हाराकिरी, न्यूझीलंडला १३९ रन्सचं आव्हान

राखीव दिवसात भारतीय फलंदाज ढेपाळले, न्यूझीलंडचा भेदक मारा
WTC Final : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाची हाराकिरी, न्यूझीलंडला १३९ रन्सचं आव्हान
फोटो सौजन्य - BCCI

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात राखीव दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केलेली पहायला मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघ १७० धावांपर्यंतच मजल मारु शकला, ज्यामुळे न्यूझीलंडला आता विजयासाठी १३९ रन्सचं आव्हान मिळालं आहे. आज दिवसभरात अजून ५० पेक्षा अधिक ओव्हर्सचा खेळ बाकी असल्यामुळे टीम इंडियावर या सामन्यात पराभवाचं सावट तयार झालं आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ पर्यंत मजल मारल्यानंतर न्यूझीलंडने २४९ रन्सपर्यंत मजल मारत निसटती आघाडी घेतली. या सामन्यात पावसामुळे दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर अखेरच्या रिझर्व्ह डे ला सामना खेळवण्याचं ठरवलं. परंतू दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. रोहित आणि शुबमनला पाचव्या दिवसाअखेरीस आऊट केल्यानंतर राखीव दिवशीही भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली.

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे तिन्ही बिनीचे शिलेदार न्यूझीलंडच्या बॉलर्सच्या जाळ्यात अकडले. यानंतर मधल्या फळीत ऋषभ पंतने न्यूझीलंडला थोडंफार तंगवलं. परंतू भारताच्या शेपटाला फारसं वळवळ करण्याची संधी न्यूझीलंडच्या बॉलर्सनी दिली नाही आणि दुसऱ्या इनिंगमध्ये भारत १७० पर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ४, ट्रेंट बोल्टने ३, काएल जेमिसनने २ तर निल वॅगनरने १ विकेट घेतली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in