23 वर्षीय यश पाटलांचा नादच करायचा नाय!, दीड वर्षात उभी केलेली कंपनी विकली तब्बल 40 हजार कोटींना

रोहित गोळे

• 05:33 PM • 20 Nov 2026

अवघ्या 23 व्या वर्षी यश पाटील यांनी स्थापन केलेल्या Applied Compute या AI स्टार्टअपचा तब्बल 4.5 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

23 year old yash patil sells applied compute for 4 5 billion dollars palo alto networks satej patil tweet

यश पाटील

Google CTA

मुंबई: भारतीय वंशाचा यश पाटील हा सध्या सिलिकॉन व्हॅली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बहुतेक तरूणांचा त्याचे बिझनेस मॉडेल सिद्ध करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तर यश पाटील याने शून्यातून सुरुवात करून अवघ्या दीड वर्षात तब्बल 40 हजार कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील दिग्गज कंपनी पालो अल्टो नेटवर्क्सने (Palo Alto Networks) आता यश पाटीलची 'अप्लाइड कंप्यूट' (Applied Compute) या स्टार्टअपच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणकशास्त्रात (Computer Science) पदवी घेतलेल्या यश पाटीलने मे 2025 मध्ये रिदम आणि लिंडेन यांच्यासोबत 'अप्लाइड कंप्यूट'ची स्थापना केली. यश पाटीलच्या लक्षात आले की, मोठ्या कंपन्या आता बाह्य AI सेवांवर अवलंबून राहू शकत नाहीत. आपला डेटा सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना स्वतःचे कस्टम AI मॉडेल्स तयार करून चालवण्याची गरज होती. 'अप्लाइड कंप्यूट' कंपन्यांना त्यांच्या स्वतःच्या डेटाचा वापर करून कस्टम AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्याची आणि त्यांना दैनंदिन व्यावसायिक कामकाजात वापर करण्याची सुविधा देते.

कंपनीने केवळ 12 आठवड्यांत सुरू केले काम

कंपनीने केवळ 18 महिन्यांत शून्यापासून 100 दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक महसुलापर्यंत (ARR) मजल मारली. लाँच झाल्याच्या अवघ्या 121 आठवड्यांत, कंपनीचा इन्फरन्स-सर्व्हिंग व्यवसाय दररोज 1 ट्रिलियन टोकन्सवर प्रक्रिया करत होता.

हे ही वाचा>> Personal Finance: प्लॉट न घेता जमिनीच्या वाढत्या किंमतीतून किती कमाई?

OpenAI मध्ये काम 

यश पाटील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर OpenAI मध्ये रुजू झाला होता. तो एप्रिल 2023 मध्ये टेक्निकल स्टाफ रेसिडेंट म्हणून OpenAI मध्ये सामील झालेला, जिथे त्यांने प्रशिक्षणोत्तर पायाभूत सुविधांवर काम केले होते. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, त्याने कंपनीत पूर्ण-वेळ टेक्निकमल टीममध्ये काम करू लागला होता. मे 2025 पर्यंत तो OpenAI मध्ये होता. त्यानंतर त्याने कंपनी सोडली आणि अप्लाइड कंप्यूटची स्थापना केली.

शिक्षण घेत असतानाच आपला पहिला स्टार्टअप केलेला सुरू 

पाटील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना स्टार्टअप उभारणीच्या कामांमध्ये सहभागी होता. त्यांच्या सुरुवातीच्या प्रकल्पांमध्ये आर्माडिलो लॅब्सचा (Armadillo Labs)समावेश होता, जे ई-कॉमर्स वेबसाइट्ससाठी मशीन लर्निंग टूल्सवर काम करत होते. त्याने स्टॅनफोर्डच्या वार्षिक हॅकाथॉन, ट्रीहॅक्सच्या यशातही महत्त्वाची भूमिका बजावलेली.

हे ही वाचा>> Personal Finance: जमीन खरेदी करताना कागदपत्रांमधील एक चूक.. तुमचा सगळा व्यवहार टाकेल बिघडवून

यश पाटीलची अप्लाइड कंप्यूट कंपनी नेमकं काय काम करते?

अप्लाइड कंप्यूटची कल्पना जानेवारी 2025 मध्ये आकार घेऊ लागलेली, जेव्हा पाटील आणि त्याचे भावी सह-संस्थापक लेक ताहोमध्ये स्कीइंगच्या सहलीवर होते. चीनी स्टार्टअप डीपसीकच्या R1 मॉडेलने हे दाखवून दिले होते की, अमेरिकेतील सर्वात मोठ्या AI लॅब्सच्या संसाधनांशिवायही शक्तिशाली ओपन-सोर्स AI मॉडेल्स विकसित केले जाऊ शकतात.

या तीन संशोधकांनी एक अशी पायाभूत सुविधा तयार करण्याच्या संधीचा शोध सुरू केला, जी कंपन्यांना त्यांच्या स्वतःच्या डेटाचा वापर करून अशी मॉडेल्स कस्टमाइझ आणि सुधारित करण्याची परवानगी देईल.

त्यांनी मे 2025 मध्ये ओपनएआय (OpenAI) सोडले आणि अप्लाइड कंप्यूटवर काम सुरू केले. पाटील सीईओ (CEO) झाला, तर गर्ग सीटीओ (CTO) आणि ली चीफ आर्किटेक्ट बनला.

अप्लाइड कंप्यूटच्या मुख्य उत्पादनामागील मूळ कल्पना एक अशी पायाभूत सुविधा तयार करणे ही होती, जी कंपन्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या डेटाचा वापर करून विद्यमान AI मॉडेल्सना विशेष, एंटरप्राइझ-रेडी सिस्टीममध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देईल.

पालो अल्टो नेटवर्क्समध्ये यशला मिळणार मोठं पद

हा करार पूर्ण झाल्यानंतर, यश पाटील पालो अल्टो नेटवर्क्समध्ये सह-मुख्य AI अधिकारी (Co-Chief AI Officer) म्हणून पदभार स्वीकारतील. तथापि, 40,000 कोटी रुपयांच्या या मोठ्या करारातून यश पाटील यांना नेमकी किती रक्कम मिळेल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. कंपनीने कंपनीमधील त्याचा हिस्सा आणि या करारामधून त्याला किती रक्कम मिळेल हे देखील उघड केलेले नाही.

पालो अल्टो नेटवर्क्सने का खरेदी केली यश पाटीलची कंपनी?

18 नोव्हेंबर रोजी या कराराची घोषणा करताना, पालो अल्टो नेटवर्क्सने सांगितले की, या अधिग्रहणामुळे अप्लाइड कंप्यूटचा AI प्लॅटफॉर्म आणि संशोधन संघ त्यांच्या विद्यमान सायबरसुरक्षा क्षेत्रातील दिग्गज कंपनीत सामील होईल, कारण कंपनी ओपन-वेब आणि प्रोप्रायटरी फ्रंटियर मॉडेल्स या दोन्हीमध्ये उद्योगांना सुरक्षितपणे AI स्वीकारण्यास मदत करू इच्छिते.

पालो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोरा म्हणाले की, अप्लाइड कंप्यूटने एक मजबूत पोस्ट-ट्रेनिंग आणि इन्फरन्स प्लॅटफॉर्म तयार केला आहे, ज्याला एका सक्षम AI संशोधन टीमचा पाठिंबा आहे. सार्वजनिक क्लाउड आणि सार्वभौम वातावरणात कंपन्यांना ओपन मॉडेल्सना सुरक्षितपणे प्रशिक्षित, कस्टमाइझ आणि डिप्लॉय करण्यास मदत करण्याची कंपनीची योजना आहे.

सतेज पाटलांकडूनही यश पाटील यांचं कौतुक

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत यश पाटील यांचं अभिनंदन केलं आहे.

त्यांनी म्हटलं की, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी Applied Compute कंपनी उभारून तिचा 4.5 अब्ज डॉलरचा व्यवहार करणं ही मोठी कामगिरी आहे. यश पाटील आता Palo Alto Networks मध्ये सह-मुख्य AI अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत सतेज पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एकूणच, वयाच्या 23 व्या वर्षी AI क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या यश पाटील यांची ही कामगिरी तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.