केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी (आयात शुल्क) वाढवण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लीटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशातील विदेशी चलन वाचवणे हाच या निर्णयांच्या पाठीमागील मुख्य हेतू आहे. सध्या भारताकडे वर्षभराचे सामान खरेदी करता येईल, इतका विदेशी चलनाचा साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार किमान तीन महिन्यांचा परकीय चलन साठा असणे आवश्यक मानले जाते. असे असूनही सरकारला ही पावले उचलावी लागली आहेत?
ADVERTISEMENT
कारण भारताकडे चीनसारखे अतिरिक्त विदेशी चलन (Surplus) नाही. भारत जेवढे डॉलर कमावतो, त्यापेक्षा जास्त डॉलर खर्च करतो. देशाचा वस्तू आणि सेवांवरील खर्च 100 डॉलर मानला, तर कमाई केवळ 88 डॉलर आहे. यातील 12 डॉलरची तूट (Current account deficit) आपण प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक (FPI) यांसारख्या परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून भरून काढत होतो.
युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताकडे विदेशी चलनाचा साठा किती होता?
भारताचा विदेशी चलनाचा साठा इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी 730 बिलियन डॉलर इतका होता, परंतु गेल्या दोन महिन्यांत त्यात सुमारे 31 अब्ज डॉलरची घट झाली आहे. इराण युद्ध सुरू झाल्यामुळे भारताला दुहेरी फटका बसला असून, कच्चे तेल महागल्याने जास्त डॉलर खर्च करावे लागत आहेत, तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 22 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी एका डॉलरची किंमत 90 रुपये होती, ती आता 96 रुपयांवर पोहोचली आहे. जेव्हा रुपयाची घसरण होते, तेव्हा रिझर्व्ह बँक विदेशी मुद्रा भंडारातून डॉलर बाजारात विकते, जेणेकरून डॉलरचा पुरवठा वाढून त्याची किंमत वाढणार नाहीत. मात्र, आरबीआयचे हे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरलेले नाहीत.
या गंभीर परिस्थितीवर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक लाहिडी यांनी सांगितले की, सध्या भारताकडे नऊ महिन्यांचे सामान खरेदी करता येईल, एवढा विदेशी चलनाचा साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार किमान तीन महिन्यांचा परकीय चलन साठा असणे आवश्यक मानले जाते, त्यामुळे सध्या आपली आर्थिक स्थिती ठीक असली, तरीही हे युद्ध जर अधिक काळ रेंगाळले तर देशाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भारताचा एकूण विदेशी चलनाचा तब्बल एक तृतीयांश (1/3) हिस्सा हा केवळ पेट्रोल, डिझेल आणि सोने-चांदीच्या आयातीवर खर्च होतो. याच कारणामुळे देशातील नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि सोने-चांदीचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











