मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने आज (7 जून) सकाळपासूनच जोर धरला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.
ADVERTISEMENT
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सक्रीय झाल्याने आता पाऊस बरसत आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, पावसाचा हा प्रकार आठवड्याच्या शेवटीपर्यंत सुरू राहील. ज्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जळगाव, नाशिक, पुणे आणि नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही असेच हवामान अंदाज आहे, जिथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहील.
40-50 किमी वेगाने वाहणार वारे
हवामान विभागाचे म्हणणे आहे की आज मुंबईत विजांसह मुसळधार पाऊस पडेल. यासोबतच 40-50 किमी वेगाने जोरदार वारेही वाहतील. मुंबईतून येणाऱ्या माहितीनुसार, अजूनही पाऊस बरसत आहे आणि जोरदार वारेही वाहत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी देखील मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला, तर महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ वातावरण होते. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत पाऊस पडत आहे. गेल्या सहा दिवसांत कुलाबा येथे 30 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 47.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यलो अलर्ट जारी
IMD ने कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यासह महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना या भागात पावसाने हजेरी लावली आहे.
ADVERTISEMENT
