Mumbai Crime: मुंबईच्या विनोबा भावे पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने पाच मित्रांनी मिळून एका 21 वर्षीय तरुणावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. अब्दुल रहमान नावाचा एक तरुण काल म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी मित्रांसोबत त्याच्या वाढदिवस साजरा करत असतानाच ही भयानक घटना घडली.
ADVERTISEMENT
केक कापण्याच्या बहाण्याने बाहेर बोलवलं अन्...
पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता, पाच मित्रांनी अब्दुलला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराच्या खाली बोलवलं. आरोपी मित्र त्यांच्यासोबत केक देखील घेऊन आले होते. अब्दुल रहमान त्याच्या घराच्या खाली आल्यानंतर, अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शरीफ शेख या पीडित तरुणाच्या मित्रांनी केक कापण्यापूर्वी मस्करी म्हणून अब्दुलवर अंडी आणि दगडे फेकली. त्यानंतर, त्यांनी स्कूटीच्या डिक्कीमधून एक बॉटल बाहेर काढली आणि त्यामध्ये असलेलं ज्वलनशील द्रव्य तरुणावर फेकून आग लावली.
हे ही वाचा: IIT च्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य; राज ठाकरे संतापले
पीडित तरुण गंभीररित्या जखमी
ही संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं आहे. यामध्ये अब्दुलला त्याच्या मित्रांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी, पीडित तरुणाने आपले कपडे काढून कशीबशी आग विझवली, मात्र यामध्ये अब्दुल गंभीररित्या जखमी झाला. अखेर, आगीत गंभीर पद्धतीने जखमी झालेल्या अब्दुलला तातडीने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी तरुणांना अटक
पीडित तरुणाकडून तक्रार मिळाल्यानंतर, विनोबा भावे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपी तरुणांविरुद्ध BNS (भारतीय दंड संहिता) च्या कलम 3 (5) आणि 110 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. तसेच, त्या पाचही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: अभिनेत्री सेलीना जेटलीचा पतीकडून शारीरीक छळ, हायकोर्टात धाव, पोटगीसाठी किती कोटी मागितले?
अब्दुल रहमान हा बॅचलर ऑफ अकाउंटिंग अॅण्ड फाइनान्स (BAF)च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी आरोपी तरुणांना ताब्यात घेतलं असून चौकशीनंतर या भयानक घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
ADVERTISEMENT











