Mumbai News: मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधील इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अशा वाहनधारकांना मुंबईतील अटल सेतूवर त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करताना टोल भरावा लागणार नाही. सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय 22 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सरकारी तसेच खाजगी वाहनांचा समावेश असणार आहे. चारचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक बसेसना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
दररोज सुमारे 60 हजार वाहने अटल सेतूवरून जात असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये बरीचशी वाहने इलेक्ट्रिक आहेत. सरकारने 2023 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांना टोल करातून सूट देण्याची घोषणा केली आहे. अटल सेतूवरील कारसाठी 250 रुपये टोल आकारला जातो. हा टोल डिसेंबर 2025 पासून लागू आहे.
पॉलिसीमध्ये नेमकं कशाचा उल्लेख?
राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये 'महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी' जाहीर केली होती, ज्याअंतर्गत अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरील इलेक्ट्रिक चारचाकी वाहने आणि बसेसना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना 50 टक्के सूट मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अटल सेतूवरील टोल माफीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे, जे शुक्रवारपासून लागू केले जाईल. तसेच ही सुविधा इतर महामार्गांवरही 2 दिवसांत सुरू होईल.
हे ही वाचा: Govt Job: आता मुंबई हायकोर्टात मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी निघाली भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?
मालवाहतूक वाहने कक्षेत नाहीत...
इलेक्ट्रिक मालवाहतूक वाहने याअंतर्गत येणार नसल्याचं या पॉलिसीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही सूट सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात ईव्ही स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आहे. अटल सेतूवरील शिवाजीनगर आणि गवन येथील टोल नाक्यावर शुक्रवारपासून हा नवीन नियम लागू होईल. अधिकाऱ्यांना आशा आहे की या धोरणामुळे ईव्हीचा वापर वाढेल आणि वाहतूक क्षेत्रात इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
हे ही वाचा: हे काय भलतंच? पोलीस कॉन्स्टेबल घरात घुसला अन् महिलेचे अंतर्वस्त्र चोरून पळाला...
मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा वाढत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 18,400 हलकी चारचाकी वाहने, 2,500 हलकी प्रवासी वाहने, 1,200 जड प्रवासी वाहने आणि 300 मध्यम प्रवासी वाहने असून यामुळे नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या 22,400 झाली आहे. अटल सेतूवरून दररोज सरासरी 60,000 वाहने धावतात.
ADVERTISEMENT
