Mumbai News: मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सिटी अॅण्ड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) कडून पहिल्यांदाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) मधील लोकांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना (हाउसिंग स्कीम) लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 4,508 रेडी-टू-मूव्ह फ्लॅट्स सिडकोच्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विकले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत सब्सिडी
विशेष बाब म्हणजे, यामध्ये लोकांना आपल्या आवडीचे फ्लॅट्स निवडता येणार आहेत. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत EWS प्रवर्गातील खरेदीदारांना 2.50 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळेल. हे फ्लॅट्स नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यासारख्या मुख्य भागात आहेत आणि ते थेट महामार्ग, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्टेशनशी कनेक्टेड आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून नोंदणीची प्रक्रिया 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.
पसंतीचा फ्लॅट निवडण्याची संधी
सिडकोच्या या नवीन गृहनिर्माण योजनेत लॉटरी सिस्टिम काढून टाकण्यात आल्याने खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट निवडण्याची संधी मिळेल. ही योजना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर काम करेल, म्हणजेच लवकर अर्ज करणाऱ्यांना फ्लॅट मिळण्याची शक्यता जास्त असेल. एकूण 4,508 फ्लॅटपैकी 1,115 फ्लॅट पीएमएवाय अंतर्गत ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी आहेत, तर उर्वरित 3,393 फ्लॅट LIG प्रवर्गातील खरेदीदारांसाठी उपलब्ध आहेत.
हे ही वाचा: Govt Job: इंजीनिअर्स उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! 'राइट्स'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
कधीपर्यंत कराल अर्ज?
सिडकोने या हाउसिंग कॉम्पेक्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बऱ्याच आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये जिम, क्लब हाऊस, मुलांना खेळण्यासाठी एरिआ, सुंदर गार्डन, 24 तास सुरक्षा आणि पार्किंगच्या सुविधांचा समावेश आहे. या योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक नागरिक cidcofcfs.cidcoindia.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 21 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी रजिस्ट्रेशन फी 236 रुपये निश्चित करण्यात आली असून नोंदणीच्या वेळी अर्जदारांनी ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि निवासाचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा: मुंबई: तरुणीने रिक्षा चालकाला केलं ऑनलाइन पेमेंट! पण, काही वेळानंतर घाणेरडे मॅसेजेस अन्... मीरा रोड येथील घटना
21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र अर्जदारांसाठी फ्लॅट निवड प्रक्रिया 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. फ्लॅटचा एरिआ आणि किंमत यासारखी इतर महत्त्वाची माहिती सिडकोच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
ADVERTISEMENT











