Nalasopara Imperial Heights Fire, वसई : नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल हाइट्स इमारतीच्या 14 व्या मजल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, सहा जणांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फाल्गुनी शाह (वय 50) आणि अश्विनी पारकर (वय 50) अशी मृत महिलांची नावे आहेत. आगीमुळे इमारतीत एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : कोट्याधीशाच्या हत्येसाठी 20 लाखाची सुपारी, पण कॉन्ट्रॅक्ट किलरने चुकून कामगाराला संपवलं
धुरामुळे गुदमरल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता
तुळिंज रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. कविता जगदा यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुरामुळे गुदमरल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आगीमुळे इमारतीत धुराचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेत सहा जणांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : बकरी चारायला गेली मुलगी, नराधमानं लहान भावासमोर केला अत्याचार
जीव वाचवण्यासाठी चौघांनी घेतला बाहेरील जागेचा आधार
आगीपासून जीव वाचवण्यासाठी इमारतीतील चार जणांनी बाहेरील एका छोट्याशा जागेचा आधार घेतला. तब्बल 40 ते 45 मिनिटे हे चौघे मदतीच्या प्रतीक्षेत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोठ्या क्रेनच्या सहाय्याने या चारही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने बचावकार्यादरम्यान परिस्थिती गंभीर बनली होती.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. माजी महापौर रुपेश जाधव यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. आचोळे पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. या आगीचे नेमके कारण काय, तसेच दुर्घटनेत किती नुकसान झाले, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे.
ADVERTISEMENT












