Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात बुधवारी (26 नोव्हेंबर) एक धक्कादायक घटना घडली. येथील कोळेगाव परिसरात घडलेल्या या घटनेने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. ज्योती धाहीजे अशी मृत महिलेची ओळख समोर आली असून आरोपी पतीचं नाव पोपट धाहीजे असल्याची माहिती आहे. पोलीस आता आरोपीच्या अटकेसाठी तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
प्राथमिक माहितीनुसार, पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. मात्र, रात्रीच्या वेळी जोडप्यात झालेला हा वाद टोकाला पोहोचला. याच वादात, आरोपी पोपट धाहीजे याने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबला आणि तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हत्येनंतर, आरोपी पती घरातून फरार झाला.
हे ही वाचा: भारतीय महिलेने पासपोर्ट दाखवला, चीनचे अधिकारी म्हणाले, अरुणाचल प्रदेश आमचा आहे; 18 तास अडवणूक अन्...
पोलिसांचा तपास
संबंधित घटनेची माहिती मिळताच, मानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथे तपास करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी गोळा केलेले पुरावे फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच, पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची बरीच पथके तयार करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासले जात आहेत. यावरून, आरोपी घटनेच्या वेळी नेमकं कुठे होता? याचा शोध घेता येईल. याशिवाय, पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
हे ही वाचा: 'गौतम गंभीर हाय हाय..' भारताच्या मोठ्या पराभवानंतर चाहत्यांची घोषणाबाजी, सिराज मदतीला धावला VIDEO
स्थानिकांनी काय सांगितलं?
स्थानिक लोकांच्या मते, हे जोडपं मागील बऱ्याच वर्षांपासून या परिसरात राहत होतं. मात्र, त्यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून इतकी गंभीर घटना घडेल, याची कोणाला काहीच कल्पना नव्हती. या घटनेने संपूर्ण कोळेगाव परिसरातील रहिवाशांना आणि संबंधित कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT











