ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक

मुंबई तक

18 Jun 2026 (अपडेटेड: 18 Jun 2026, 09:42 AM)

Thane Crime News : अंबरनाथमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीला पोलिसांनी केले अटक.

Thane Crime News

Thane Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे

point

अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक

Thane Crime News : अंबरनाथमध्ये हुंड्यासाठी सुरू असलेल्या अनन्वित छळाला कंटाळून एका 26 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाखा टिळेकर असे या मृत विवाहितेचे नाव असून, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात तिने आपले जीवन संपवले. 30 एप्रिल 2026 रोजी अंबरनाथ येथील डॉ. नितीन टिळेकर याच्याशी विशाखाचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी सर्व काही सुरळीत असताना, लग्नानंतर काही दिवसांतच तिला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. माहेरून अधिक पैसे आणि दागिने आणण्यासाठी पतीकडून तिचा सतत छळ केला जात होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : सेंटर पॉईंट: फुटीर खासदार आणि 'हाचिको' श्वानाची गोष्ट, सत्तेतल्या नेत्यांना झालाय भस्म्या?

विशाखाच्या कुटुंबीयांचे डॉक्टर पतीवर गंभीर आरोप 

मृत विशाखाच्या कुटुंबीयांनी पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विशाखावर संशय घेऊन तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉ. नितीन टिळेकर याने संपूर्ण घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखाला शेजाऱ्यांशी बोलण्यास किंवा माहेरच्या लोकांशी संवाद साधण्यासही मज्जाव करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी केवळ शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून पतीने तिला मारहाण केली होती. आत्महत्येच्या काही काळापूर्वीच विशाखाने आपल्या आईला फोन करून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. आई-वडील तिला घेण्यासाठी घरी येत असतानाच तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

हेही वाचा : सेंटर पॉईंट: फुटीर खासदार आणि 'हाचिको' श्वानाची गोष्ट, सत्तेतल्या नेत्यांना झालाय भस्म्या?

नवविवाहितेच्या आयुष्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ

विशाखाच्या वडील अनिल शिवाजी शिंदे यांनी या प्रकरणातील छळाचा पाढा वाचून दाखवला असून तिच्या आजीने, सुमन शिवाजी शिंदे यांनीही या अमानवीय वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विशाखाच्या कुटुंबीयांनी आरोपी पतीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. नवविवाहितेच्या आयुष्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणातील इतर संशयितांचीही चौकशी करत आहेत.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती डॉ. नितीन टिळेकर याला अटक केली आहे. त्याच्यावर हुंड्यासाठी छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत असून, विशाखाच्या सासरच्या इतर मंडळींचाही या छळवणुकीत सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. न्यायालयात आता या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.