सेंटर पॉईंट: फुटीर खासदार आणि 'हाचिको' श्वानाची गोष्ट, सत्तेतल्या नेत्यांना झालाय भस्म्या?
ठाकरे गटाच्या खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही आहे. या सगळ्यावरून तुम्हाला जपानी श्वानाची गोष्ट नक्की आठवेल.
ADVERTISEMENT

मुंबई: हाचिको (Hachiko) हा जपानमधील 'अकिता' जातीचा एक अत्यंत इमानी कुत्रा होता. १९२० च्या दशकात तो प्राध्यापक हिदेसाबुरो युएनो यांच्यासोबत टोकियोमध्ये राहायचा. हाचिकोचा रोजचा नियम होता. दररोज सकाळी प्राध्यापक युएनो कामासाठी बाहेर पडायचे, तेव्हा हाचिको त्यांना सोडायला शिबुया रेल्वे स्टेशनपर्यंत जायचा. संध्याकाळी जेव्हा प्राध्यापक कामावरून परत यायचे, तेव्हा हाचिको आधीपासूनच तिथे त्यांची वाट पाहत उभा असायचा. हा नित्यक्रम वर्षभर सुरळीत चालू होता. पण एका दिवशी अचानक घडले असे की, विद्यापीठात शिकवत असताना प्राध्यापकांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ते कधीही स्टेशनवर परतले नाहीत.
नेहमीप्रमाणे हाचिको संध्याकाळी स्टेशनबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत उभा होता. मालक परत न आल्याने तो दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला... असं करत करत तो तब्बल 9 वर्षे, 9 महिने आणि 15 दिवस रोज संध्याकाळी स्टेशनवर ट्रेन येण्याची आणि मालक बाहेर येण्याची वाट पाहत राहिला. शेवटी एका दिवशी, वयाच्या अकराव्या वर्षी या निष्ठावान कुत्र्याचा शिबुया स्टेशनवरच मृत्यू झाला. संपूर्ण जपानला हा प्रकार समजल्यावर ते हळहळले. कुत्र्याची ही अनोखी निष्ठा पाहून जपानमधील लोकांनी स्टेशनबाहेर त्याचा कांस्याचा पुतळा उभारला, जो आजही सर्वांना त्याच्या प्रामाणिकपणाची आणि प्रेमाची आठवण करून देतो.
आता दुसरी गोष्ट...
महाराणा प्रताप हे मेवाडच्या सिसोदिया घराण्यातील सर्वात शूर शासक होते. अकबराच्या नेतृत्वातील मुघल साम्राज्याविरोधात त्यांचा प्रतिकार सर्वश्रुत आहे. त्यांच्या सैन्यात जसे एकनिष्ठ सहकारी होते तसाच एक रामप्रसाद नावाचा हत्तीही होता. रामप्रसाद हा महाराणा प्रताप यांचा युद्धहत्ती होता. त्याची ओळख शौर्य आणि अंतर्ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. हळदीघाटीच्या लढाईत रामप्रसादनं असामान्य शौर्य दाखवलं.. त्यानं ताकदीनं मुघल सैन्यावर हल्ला केला. अखेर रामप्रसादला लढाईदरम्यान घेरण्यात आलं. त्याला पकडून अकबरासमोर हजर केलं. त्याची महारत आणि ख्याती कानावर होतीच. त्यामुळे अकबरानं त्याच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय केली. त्याचं नाव बदललं.. पीरप्रसाद ठेवलं.. पण रामप्रसादनं हे सर्व नाकारलं.. अन्नपाणी सोडून दिलं.. रामप्रसादची निष्ठा इतिहासात कायम राहिली.
आता, तुम्ही म्हणाल की या गोष्टींचा आजच्या विषयाशी काय संबंध आहे.. आता तेच जाणून घेऊयात सविस्तरपणे.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरनं धुमाकूळ घातला आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलंय. हे सहाही खासदार 2024 ला मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. त्यावेळी यातल्या एक दोन लोकांची भाषा काय होती बघा.









