Navi Mumbai Crime: बऱ्याचदा आपण घरातून बाहेर निघताना आपल्या शेजाऱ्यांना घराची चावी देतो आणि “जर घरातलं कोणी आलं तर घराच्या चावी द्या”, असं त्यांना सांगतो. तसेच, नातेवाईकांवर देखील आपला आणखी विश्वास असतो; जरी ते आपल्या घरातील लोक नसले तरी, आपण त्यांना राहण्यासाठी घराची चावी देण्यास मागेपुढे पाहत नाही. पण कधीकधी अशाच लोकांकडून आपली मोठी फसवणूक होते.
ADVERTISEMENT
बहिणीच्याच घरी केली चोरी
नवी मुंबईमधून नातेसंबंधाला लाज आणणारी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे, एका 29 वर्षीय महिलेला तिच्याच बहिणीच्या घरातून 24.42 लाख रुपयांचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (5 सप्टेंबर) पोलिसांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं, की चोरी केल्यानंतर आठ तासांच्या आतच आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या आरोपीला 31 ऑगस्ट रोजी मुंब्रा परिसरातील तिच्याच बहिणीच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: अरे देवा! तरुणीने दिला लग्न करण्यास नकार... संतापलेल्या तरुणाने तरुणीचं नाकच कापलं अन्...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, “तक्रारदार घराला कुलूप लावून तिच्या आईला भेटायला गेली होती, तेव्हा कोणीतरी व्यक्ती तिच्या घराची डुप्लिकेट चावी घेऊन तिच्या घरात शिरली आणि 24.42 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली.” तसेच, जबरदस्तीने घरात घुसल्याचे कोणतेही संकेत आढळले नसल्याने, तक्रारदाराच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा केला असावा, असा पोलिसांना संशय आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: डॉक्टरांनी केलं ‘ब्रेन डेड’ घोषित पण अंत्यसंस्कार होण्यापूर्वी खोकला सुरू झाला अन्... नाशिकमधील धक्कादायक घटना
टेक्निकल पुरावे, मोबाईल फोन विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलीस आठ तासांच्या आत आरोपींपर्यंत पोहोचले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी सांगितलं की चौकशीदरम्यान, आरोपीने सुरुवातीला टीमची दिशाभूल केली, परंतु नंतर सर्व आरोप मान्य केले.
ADVERTISEMENT
