पुणे: पुणे शहरातील नवले पुलावर आज (13 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास एका मालवाहू ट्रकने 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या धडकेनंतर दोन ट्रकला आग लागली आणि त्यांच्यामध्ये एक चारचाकी कार सापडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
नेमका कसा घडला अपघात?
प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, एका मालवाहू ट्रकने वेगात असताना समोरून येणाऱ्या वाहनांना धडक दिली. यात एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही ट्रकला झपाट्याने आग लागली. या आगीमध्ये मध्यभागी अडकलेली एक कार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचा भडका इतका प्रचंड होता की, दूरवरूनही धुराचे लोट दिसत होते.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात येत असून, आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर नवले पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. त्यामुळे परिसरात किलोमीटर लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुलावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वेगमर्यादा, रस्त्याची रुंदी आणि ट्रक चालकांच्या बेदरकारपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी क्रेनचा वापर करून दुर्घटना ग्रस्त गाड्या बाजूला करून रस्ता मोकळा केला आणि काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
दरम्यान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ते सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब गोळा करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT











