Baramati Crime News : बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खैरेपाडळ परिसरात ही घटना उघडकीस आली असून, रस्त्याच्या बाजूला नग्न अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
वतीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून हत्या केल्याचा अंदाज
घटनेची माहिती मिळताच सूपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत प्राथमिक तपास सुरू केला. प्राथमिक तपासात सदर तरुणीचे वय अंदाजे 25 ते 27 वर्षे असल्याचे समोर आले आहे. मात्र, मृत युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच, अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने हत्याराच्या सहाय्याने युवतीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत युवतीची ओळख पटवण्यासाठी तसेच हत्या नेमकी कशामुळे आणि कोणी केली, याचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपीने युवतीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. मृतदेहाची अवस्था पाहता हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूला नग्न मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घटनेमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात हत्या झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. तसेच, श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य टेक्निकल टूल्सच्या सहाय्याने तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शक्य त्या दिशेने तपास करण्यात येत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











