Pune balajinagar firing case : : पुणे शहरातील गुन्हेगारी आणि टोळी संघर्ष पुन्हा एकदा अत्यंत भीषण रित्या समोर आला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर सुरू असलेली वैराची मालिका अद्याप थांबलेली नाही. शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी (दि.20) सकाळी भरदिवसा अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (वय 26) या रिक्षाचालकावर आंदेकर टोळीच्या नावाने गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निधेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषी आंबट या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मध्यरात्री काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन् पुतण्याने... 'नको तो प्रकार' बरोबर कॅमेऱ्यात झाला कैद
बालाजी नगर गोळीबार प्रकरणात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात कृष्णा आंदेकर, बंडु आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमित बहादुरकर, स्वप्नील बहादुरकर यांच्यासह निधेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषी आंबट, लाला उर्फ अमन आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी रिक्षाचालक अक्षय मस्के यांच्या पत्नी करुणा मस्के यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) हा युवक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. जखमी अक्षय म्हस्के याला एक लहान मुलगी असल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा : मध्यरात्री काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन् पुतण्याने... 'नको तो प्रकार' बरोबर कॅमेऱ्यात झाला कैद
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सव्वादहा वाजण्याच्या दरम्यान अक्षय म्हस्के हा बालाजीनगर येथील संविधान चौक परिसरात आला होता. तो तिथे थांबला असतानाच अचानक दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवून थेट गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी घटनास्थळी तब्बल तीन राऊंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती असून, त्यातील एक गोळी अक्षयच्या शरीराला लागली. गोळीबार केल्यानंतरही नराधम हल्लेखोर तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या जवळील धारदार कोयत्याने अक्षयवर सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून वेगाने पसार झाले.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर सूड उगवला
भरचौकात घडलेल्या या भयानक घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे बालाजीनगर आणि आसपासच्या परिसरात काही काळासाठी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळी आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी अक्षय म्हस्के हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. तसेच मध्य प्रदेशातून पुण्यात बेकायदेशीर पिस्तुले आणण्यात अक्षय म्हस्के याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच या हल्ल्यामागे जुना टोळी संघर्ष, टोळीचे वर्चस्व आणि आंदेकर यांच्या हत्येचा सूड उगवण्याची भावना कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर शहरात सलग हिंसक घटना घडताना दिसत आहेत, ज्यामुळे नागरिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरात आयुष्य कोमकर याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, आणि त्यानंतर एका आरोपीच्या रिक्षाचालक भावावरही जीवघेणा हल्ला झाला होता. बुधवारी झालेला हा ताजा हल्ला देखील त्याच जुन्या वैराच्या आणि टोळी युद्धाच्या साखळीतून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ADVERTISEMENT











