पुणे : थोडासा वाद झाल्याने संतापली, महिलेने युवकाला 2 कि.मी. लांब फरफटत नेले; पाहा व्हिडीओ

Pune Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरकडून संगमवाडीच्या दिशेने येताना चौकाजवळ दोन्ही वाहनांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इनोव्हा चालकाने आपली गाडी रस्त्यात आडवी लावून महिलेच्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दोन्ही चालकांमध्ये शाब्दिक वाद वाढला. संतप्त झालेल्या इनोव्हा चालकाने महिलेच्या कारसमोर उभे राहून तिला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

18 Jan 2026 (अपडेटेड: 18 Jan 2026, 04:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : थोडासा वाद झाल्याने संतापली

point

महिलेने युवकाला 2 कि.मी. लांब फरफटत नेले; पाहा व्हिडीओ

Pune Crime News ,पुणे : संगमवाडी रस्त्यावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. एका महिलेने युवक बोनेटवर अडकलेला असताना  दोन किमीपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका महिला चालकाची कार आणि एका इनोव्हा चालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणावर गेला आणि अखेर युवकाला जीव धोक्यात घालणारा प्रसंग ओढवला.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरकडून संगमवाडीच्या दिशेने येताना चौकाजवळ दोन्ही वाहनांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इनोव्हा चालकाने आपली गाडी रस्त्यात आडवी लावून महिलेच्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दोन्ही चालकांमध्ये शाब्दिक वाद वाढला. संतप्त झालेल्या इनोव्हा चालकाने महिलेच्या कारसमोर उभे राहून तिला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

वाद चिघळल्यानंतर महिलेने कार न थांबवता पुढे नेली. याच वेळी इनोव्हा चालक थेट कारच्या बोनेटवर अडकला. धक्कादायक बाब म्हणजे, अशा अवस्थेतही कार थांबवण्यात आली नाही. संबंधित महिला चालकाने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत कार चालवत नेल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान युवक बोनेटवर लटकलेला असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

काही अंतरानंतर अचानक ब्रेक लावण्यात आल्याने तो युवक थेट रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी VIP बंदोबस्तासाठी परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमी युवकाला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

या घटनेमुळे संगमवाडी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रस्त्यावरील वादातून घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनांची माहिती घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात संबंधित महिला चालक आणि जखमी युवक यांची चौकशी केली जात आहे. कायद्याच्या चौकटीत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. भररस्त्यात घडलेल्या या थरारक घटनेने रस्त्यावरील वाद किती धोकादायक ठरू शकतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
 

    follow whatsapp