पुणे : कबुतर पाहायला थांबले, कुत्रा भुंकल्याने पळू लागले; कबुतर चोरल्याच्या संशयावरुन लोकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यातील वानवडी भागात कबूतर चोरीच्या संशयावरून एका 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून, उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

19 Mar 2026 (अपडेटेड: 19 Mar 2026, 11:57 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : कबुतर पाहायला थांबले, कुत्रा भुंकल्याने पळू लागले

point

कबुतर चोरल्याच्या संशयावरुन लोकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

Pune Crime News : पुणे शहरातील वानवडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आलीये. कबूतर चोरीच्या संशयाने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. रुपेश धनराज शिंदे असे या मृत तरुणाचे नाव असून तो पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी होता. ही संपूर्ण घटना 18 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 2.30 ते 3.00 च्या सुमारास घडली. रुपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात असताना हडपसर जवळील शंकरमठ परिसरात थांबले होते. तिथे असलेल्या पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत काही कबूतरांचे बॉक्स होते. कुतूहलापोटी हे तरुण तिथे गेले असता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. आपला चोरीचा उद्देश नसतानाही पकडले जाण्याच्या भीतीने हे तरुण तिथून पळू लागले, मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

हे वाचलं का?

पळताना कोसळला आणि जमावाच्या तावडीत सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यावर असलेल्या जीनमाता मोटर्ससमोर पळत असताना रुपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यावेळी पाठलाग करणाऱ्या 4 ते 5 जणांच्या जमावाने त्याला घेरले. चोर असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याला कोणतीही विचारपूस न करता लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की रुपेश गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र घाबरून तिथून पळून गेल्याने रुपेश एकाकी पडला होता. मारहाणीनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या रुपेशला पहाटेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, रुग्णालयात दाखल करताना त्याला अपघात झाला असल्याचे खोटे कारण सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान जखमा गंभीर असल्याने रुपेशची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर; भाजप प्रवेश करुन परतत असताना काय घडलं?

पोलीस कारवाई आणि आरोपींची धरपकड

रुपेशच्या मित्रांनी सकाळी 9.30 च्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. त्याच वेळी रुग्णालयातूनही निरोप आल्याने नातेवाईकांनी तिथे धाव घेतली, परंतु तोपर्यंत रुपेशचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रुपेशच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना गौरव माजी (वय 22), सचिन माजी (वय 23), मोनू माजी (वय 26) आणि बंटी माजी (वय 18) या चार भावांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी हडपसर परिसरातील रहिवासी आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात केवळ संशयावरून एका तरुणाला कायद्या हातात घेऊन ठार मारले गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कबूतर चोरीच्या शुल्लक संशयावरून तरुणाचा जीव घेणे हे समाजाच्या वाढत्या क्रूरतेचे लक्षण असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. वानवडी पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत असून, या मारहाणीत आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. मयत रुपेश हा कुटुंबातील तरुण मुलगा असल्याने त्याच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणातील तपासाची माहिती घेत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईतील हायप्रोफाईल सोसायटीत बिबट्या शिरला, कुत्र्याला फाडून खाल्ल्याने भीतीचं वातावरण VIDEO
 

    follow whatsapp