श्रीकृष्ण पांचाल, पुणे: पाकिस्तानमध्ये निर्मित झाल्याचे पॅकेजिंगवर नमूद असलेल्या कॉस्मेटिक क्रीमची पुण्यात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेने (ATB) पिंपरी परिसरातील एका कॉस्मेटिक्स दुकानावर कारवाई करत ‘गोरी ब्यूटी क्रीम’चे 23 नग जप्त केले आहेत. जप्त केलेल्या क्रीमची एकूण किंमत सुमारे 12 हजार 650 रुपये असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स या दुकानात पाकिस्तान निर्मित असल्याचे नमूद असलेली ‘गोरी ब्यूटी क्रीम’ विकली जात असल्याची माहिती ATB पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ATBच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित दुकानावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांना दुकानात ‘Made in Pakistan’ असे स्पष्टपणे नमूद असलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’चे 23 नग आढळून आले. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेतला आहे.
23 क्रीमची किंमत 12,650 रुपये
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक क्रीमची किंमत सुमारे 550 रुपये आहे. त्यानुसार 23 क्रीमची एकूण किंमत सुमारे 12,650 रुपये होते. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश मनोहरलाल गुरु यांना आरोपी केले आहे.
या प्रकरणी भारतीय कंपनीचे अधिकृत तपास अधिकारी आर. इरशादीन इनामदार यांच्या तक्रारीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलमांसोबतच कॉपीराइट कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमधून क्रीम भारतात कशी आली?
या कारवाईनंतर आता पोलिसांच्या तपासाचा मुख्य भाग क्रीमच्या पुरवठ्याभोवती केंद्रित झाला आहे. दुकानात आढळलेली ही क्रीम नेमकी कुठून आणण्यात आली, तिचा पुरवठादार कोण आहे आणि ती पुण्यातील दुकानापर्यंत कशी पोहोचली, याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
त्यामुळे हे प्रकरण केवळ दुकानात 23 क्रीम आढळण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. या उत्पादनाची सप्लाय चेन आणि त्याच्या वितरणामागील स्रोत तपासण्याच्या दिशेनेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
पोलिसांच्या माहितीनुसार, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानमधून भारतात विविध प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आहेत. त्यामुळे ‘Made in Pakistan’ म्हणून नमूद असलेली प्रतिबंधित वस्तू विक्रीसाठी आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंपरी परिसरातील या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या क्रीमची पुढील तपासणी आणि तिच्या पुरवठ्याबाबत चौकशी सुरू आहे. पाकिस्तान निर्मित असल्याचे नमूद असलेली ही क्रीम पुण्यातील दुकानापर्यंत नेमकी कशी पोहोचली, याचा तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












