दिवाळीचा सण जवळ आल्याने पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीचा परिणाम आता प्रवासाच्या खर्चावरही झाला आहे. रेल्वेची तिकिटं मिळणं कठीण झालं असून विमान प्रवासाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडत आहेत. पण खासगी बसच्या तिकीटांचे दर (Private Bus Ticket Prices) सामान्य दरांच्या तुलनेत दोन ते तीन पट वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पुणे ते देगलूर मार्गावर साधारण 900 रुपयांचं तिकीट 2,200 रुपयांपर्यंत विकलं जात असल्याचं समोर आलं आहे. पुणे ते नागपूर मार्गावरही बसच्या प्रकारानुसार 1,500 ते 6,800 रुपयांपर्यंत दर आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे RTO ने तपासणी मोहीम सुरू केली आहे. खासगी बसचे दर MSRTC च्या तुलनात्मक भाड्याच्या दीडपटापेक्षा जास्त असू शकत नाहीत. पुण्यातील प्रवाशांची परिस्थिती आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्यावर पहारेने वार, मृतदेह फेकला कालव्यात; न्यायालयाचा मोठा निर्णय
नागपूरला जाण्यासाठी तिकीट मिळवताना मोठी रांग
नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात राहणारे अनेक जण दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे एसटी स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, पैठण आणि अमरावती अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी स्थानकावर पोहोचले आहेत. काही प्रवाशांचे आरक्षण झाले आहे, तर काही जण तिकीट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अचानक प्रवासाचे नियोजन केल्यामुळे अनेकांना तिकीट मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका प्रवाशाने नागपूरला जाण्यासाठी तिकीट मिळवताना मोठी रांग असल्याने बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले.
सामान्य दिवसांत 800 ते 900 रुपये असलेले तिकीट आता 3000 रुपयांपर्यंत पोहोचले
दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचा अनुभव प्रवाशांनी सांगितला. सामान्य दिवसांमध्ये नागपूरला जाण्यासाठी साधारण 1300 ते 1400 रुपये तिकीट असते. मात्र, दिवाळीच्या काळात याच प्रवासासाठी 4500 रुपये मोजावे लागत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. तर हिंगोली आणि इतर भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांनीही खासगी बसचे दर वाढल्याचे सांगितले. सामान्य दिवसांत 800 ते 900 रुपये असलेले तिकीट आता 3000 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही प्रवाशांना खासगी बसचे तिकीट उपलब्ध नसल्याने छत्रपती संभाजीनगरमार्गे पुढील प्रवास करण्याचे नियोजन करावे लागत आहे. खासगी बसचे भाडे 2000 ते 2500 रुपये असल्याचेही प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीने प्रवास करणे परवडणारे असल्याचे म्हटले आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या वाढलेल्या भाड्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून दिवाळीच्या काळात तिकीट दर दोन ते तीन पट वाढवले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. एका प्रवाशाने सरकारने खासगी बसच्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान दर निश्चित करावेत, अशी मागणी केली. सामान्य दिवसांत 800 रुपये तिकीट असताना सणासुदीच्या काळात 3000 ते 4000 रुपये आकारणे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ग्रामीण भागात पाऊस आणि पाण्याची परिस्थितीही प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. मात्र, दिवाळीसाठी आई-वडिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जाणे आवश्यक असल्याने प्रवास करावाच लागत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. शिवाजीनगरप्रमाणेच पुणे स्टेशन आणि शहरातील इतर एसटी स्थानकांवरही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी गावी जाण्याची ओढ आणि खासगी बसच्या वाढलेल्या भाड्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे कल असल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT












