Pune-Mumbai Expressway traffic jam , पुणे : आडोशी बोगद्या जवळ अपघातग्रस्त झालेला टँकर तब्बल 32 तासांनंतर अखेर रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला असला तरी देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे. टँकर हटवण्यात आल्यानंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT
विशेषतः पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे जिल्ह्यातील लोणावळा बायपास एक्सप्रेस वे तसेच जुन्या मार्गांवर अडकून पडली आहे. मावळ तालुक्यातील अनेक भागांत वाहनांची अक्षरशः रांगच्या रांगा लागल्या आहेत. वाहनचालक तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर झोपी गेले आहेत. रस्त्याच्या मधोमधच वाहने दिवसभर ठप्प होती. त्यामुळे झोपी जाण्याचा प्रकार घडल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे.
बोरघाट घाट विभागातील वाहतूक जरी सध्या मोकळी झाली असली, तरी टँकर अपघाताचे परिणाम त्या पलीकडेही जाणवत आहेत. जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर देखील अशीच परिस्थिती असून, वाहनांची संथ गती आणि ठप्प वाहतूक यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक प्रवासी, कुटुंबीय आणि मालवाहू वाहनचालक रात्रभर रस्त्यावरच अडकून राहिल्याचे चित्र आहे.
पुणे हद्दीतील खंडाळा पासून वडगाव मावळपर्यंत एक्सप्रेस वे तसेच जुन्या महामार्गावर अनेक वाहनचालकांनी वाहनांमध्येच रात्र काढली. काही ठिकाणी वाहनचालक झोपी गेल्यामुळे पुढील वाहतूक पुढे सरकू शकत नव्हती. परिणामी, बोरघाटात वाहतूक क्लिअर असूनही मागील टप्प्यांवर मोठी अडचण निर्माण झाली. दरम्यान, वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून झोपी गेलेल्या वाहनचालकांना उठवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सातत्याने सूचना देण्यात येत असून, वाहनचालकांना संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे–मुंबई एक्सप्रेस वे आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच विनाकारण वाहन थांबवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. टँकर अपघात हटवूनही निर्माण झालेली ही वाहतूक कोंडी प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून, लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली प्रचार सभा, राज्यात मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT











