गणेश जाधव, बार्शी: बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात मोबाइलवरील एका ऑनलाइन गेमच्या व्यसनाने एका तरुणाचा जीव घेतला आहे. 32 वर्षीय समाधान ननवरे हा एक कर्ता पुरुष, एक तरुण व्यावसायिक पण ‘चक्री गेम’च्या नादात त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य सपवलं. सरकारने या गेमवर बंदी घातली असली, तरी नवे नाव व नवे नेटवर्क घेऊन पुन्हा हा गेम सुरू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, ननवरे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.
ADVERTISEMENT
दीड वर्षांपासून व्यसन, लाखोंचा व्यवहार
समाधान ननवरे गेल्या सात वर्षांपासून बार्शीत ‘डायमंड सलून’ नावाने व्यवसाय करत होता. मात्र, मागील दीड वर्षांपासून त्याला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. कधी लाख रुपये जिंकत, तर दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांचं नुकसान. अशा या चक्री फेऱ्यात तो अडकला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्र, नातेवाईक आणि खासगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतले होते. एवढंच नाही, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही कर्ज घेऊन त्याने गेममध्ये पैसे गुंतवले होते.
हे ही वाचा>> 'चल खोलीत...', तरूणी म्हणाली 'येत नाही..' चिडलेल्या बॉयफ्रेंडने केली भलतीच गोष्ट!
24 ऑक्टोबरच्या रात्री त्याने आई व बहिणींसोबत जेवण केले आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. पहाटे आई सीताबाई उठल्या असता, घरातील स्लॅबवरील लोखंडी हुकावर समाधानने गळफास घेतल्याचं त्यांना दिसून आलं. तात्काळ समाधानला खाली उतरवण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पतीने जीवन संपवलं, पत्नीचा आक्रोश
समाधानच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा अक्षरशः आधाराविना झाले आहेत. पत्नीने मुंबई तकशी बोलताना सांगितलं की, “माझ्या संसारात सगळं छान चाललं होतं, पण मागील दीड वर्षांपासून तो या गेमच्या नादी लागला. आम्ही समजावलं, पण तो ऐकायला तयार नव्हता. आज माझे आई-वडील नाहीत, भाऊ नाही. आता माझ्या मुलाला मी कसं वाढवू? जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तसं दुसऱ्या कोणाचं होऊ नये, हीच माझी प्रार्थना आहे.”
स्थानिक एजंटांमार्फत गेमसाठी गुप्त नेटवर्क
या प्रकरणात समाधानचे मेहुणे माऊली लोखंडे यांनी या गेमच्या गुप्त जाळ्याचं वास्तव उघड केलं आहे. त्यांनी सांगितलं. “शासनाने गेमवर बंदी घातली असली, तरी तो अजूनही स्थानिक एजंटांमार्फत चालतो. एजंट खेळाडूंना युजर आयडी आणि पासवर्ड देतात, तर खेळासाठी लागणारा ‘वर्च्युअल बॅलन्स’ दुसऱ्या व्यक्तीकडून पुरवला जातो. जेणेकरून कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये. पैसे न दिल्यास ‘दुकानाला कुलूप लावू’, ‘जीवे मारू’ अशा धमक्या दिल्या जातात.'' यावरून हे स्पष्ट होतं की, हे नेटवर्क चालविणाऱ्यांची दहशत किती मोठी आहे.
हे ही वाचा>> “15 हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ...” UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या रामकेश हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर!
या गेमच्या पाठीशी कोण?
समाधानचे कुटुंब तीन पत्र्यांच्या खोलीत राहतं. मजुरी करून संसार उभा केला, पण या गेमच्या नादी लागून सर्व काही उद्ध्वस्त झालं. त्यामुळे आता कुटुंबीयांचा प्रश्न आहे की, “आजपर्यंत केलेले कष्ट शून्य झाले. आता जगायचं कोणासाठी?”
त्यामुळे त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या गेमच्या पाठीशी कोण आहेत, हे शोधून कठोर कारवाई करावी,
जेणेकरून पुन्हा कुणाचं समाधान ननवरेसारखं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये.
डिजिटल जुगाराची विषारी संस्कृती
राज्यात अशा अनेक घटना घडल्या असून, ऑनलाइन गेमिंगविरोधात विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उठवला गेला आहे. तरीही स्थानिक नेटवर्क, एजंट आणि नवे अॅप्स यांच्या माध्यमातून हे गेम आजही सुरू आहेत. ही घटना केवळ एका घराची नाही, तर समाजासाठी गंभीर इशारा आहे. मोबाइलच्या व्यसनाने वाढणारा हा डिजिटल जुगार तरुणाईला आर्थिक आणि मानसिक अंधारात ढकलतो आहे.
ADVERTISEMENT











