Agra girl falls from apartment : मॉर्निंग वॉकला गेलेल्या आईला पाहाण्यासाठी व्याकुळे झालेली चिमुकली गॅलरीकडे धावली. पण गॅलरीतून खाली पाहात असतानाच तिचा तोल गेला आणि ती 7 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. यात 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आग्रा – सिकंदरा परिसरातील रामरघू आनंदा फेज-2 अपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकाने सकाळी सुमारास पाच वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अनाहिताचे वडील मनोज प्रताप सिंह हे सध्या सौदी अरेबियातील एका रिफायनरीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत, तर आई धारणा सिंह सैंया येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. कुटुंब काही महिन्यांपूर्वीच बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथून आग्रातील या अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते.
अनाहिताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक आणि शेजारी धावले
कुटुंबात अनाहिता व्यतिरिक्त दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. बुधवारी पहाटे सुमारे 4.15 वाजता ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, धारणा सिंह घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी अनाहिता घरातील बाल्कनीत आली. ती रडत असल्याचं आईने सांगितलं असून काही क्षणातच ती सातव्या मजल्यावरून खाली कोसळली. अनाहिताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक आणि शेजारी धावत आले. त्यांनी तिला पाहताच ती खाली पडून गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, काही क्षणातच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच सिकंदरा पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच एसीपी संजय महाडिक अक्षय आणि डीसीपी सोनम कुमार घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी अपार्टमेंट परिसराची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, अद्याप अपघात कसा घडला याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी काही रहिवाशांची चौकशी केली आहे. सकाळी इतक्या लवकर बालकनीत मुलगी कशी आली आणि ती खाली कशी पडली, याचा तपास सुरू आहे.
एसीपी संजय महाडिक अक्षय यांनी सांगितले की, "अनाहिता हिच्या मृत्यूबाबत सर्व कोनातून चौकशी सुरू आहे. सध्या यामध्ये कोणतीही संशयास्पद बाब दिसत नाही. मात्र, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल." या दुर्दैवी घटनेनंतर अपार्टमेंट परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनाहिता ही घरातील लाडकी मुलगी होती. तिच्या अकस्मात निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
