Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली गावात गुरुवारी (दि. 16) सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. फक्त पतंग आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुकलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. कनिष्का शशिकांत मेश्राम असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
पतंग घेऊन येत असताना कनिष्काला रेल्वेने चिरडलं
अधिकची माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी कनिष्का आपल्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींसोबत खेळत होती. खेळता-खेळता तिला पतंग घ्यायचा असल्याने तिने घरून काही पैसे घेतले आणि रेल्वे रूळ ओलांडून समोरील दुकानात गेली. पतंग खरेदी केल्यानंतर ती आनंदाने घरी परत येत होती. मात्र, तेवढ्यात रायपूरहून नागपूरकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडीने तिला चिरडले. धडकेचा आवाज होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत कनिष्काचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीचा मृतदेह पाहताच पालकांचा आक्रोश फुटला. संपूर्ण गाव या घटनेने स्तब्ध झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कनिष्काच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी पूर्वी एक रेल्वे गेट होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी रेल्वे विभागाने ते बंद करून उड्डाणपूल (फ्लायओव्हर) तयार केला आहे. पुलावरून जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि पादचारी, रोजचा मार्ग कमी करण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कनिष्काचा मृत्यूही अशाच दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावकऱ्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाने येथे सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
कनिष्का ही शशिकांत मेश्राम यांच्या दोन मुलींमधील धाकटी होती. तिची थोरली बहीण सहावीत शिकत असून, कनिष्का चौथीच्या वर्गात होती. तिचे वडील सालेकसा नगर परिषदेत, तर आई आमगाव नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कनिष्काच्या अचानक मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात आपल्या गोड मुलीला गमावलेल्या मेश्राम दाम्पत्यांचे दु:ख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. छोट्या कनिष्काच्या मृत्यूने संपूर्ण कुंभारटोली गाव शोकसागरात बुडाले आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
